अभिनेत्याच्या निधनानं तीन महिन्यांच्या गर्भवती पत्नीवर दु:खाचा डोंगर

अखेर नियतीच्या मनात मात्र वेगळच होतं....

Updated: Jun 9, 2020, 03:26 PM IST
अभिनेत्याच्या निधनानं तीन महिन्यांच्या गर्भवती पत्नीवर दु:खाचा डोंगर
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : काही दिवसांपूर्वीच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कन्नड सिनेजगतातील एका लोकप्रिय अभिनेत्याच्या निधनानं सारं कलाविश्व हादरलं. अतिशय कमी वयात अभिनेता चिरंजीवी सारजा यानं जीवनाच्या या व्यासपीठावरुन एक्झिट घेतली. साहसी भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या चिरंजीवी यांचं वयाच्या ३९ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सर्वाधिक चिंता वाटली ती म्हणजे त्यांच्या पत्नीची. 

आयुष्यात येणारं प्रत्येक वळण इतकं अनपेक्षित असतं की, ते आपल्यावर आघात करणार की सुखाची उधळण याचा काहीच नेम नसतो हे म्हणतात ते खरंच आहे. कारण, एकिकडे चिरंजीवी यांची पत्नी आयुष्यात मातृत्त्वाची चाहूल लागल्यामुळं आनंदात असतानाच त्यांच्याव पतीच्या अकस्मात निधनाचा आघात झाला आहे. मेघना सारजा या तीन महिन्यांच्या गर्भवती असून आताच्या या प्रसंगी त्या अतिशय धीटपणे साऱ्या परिस्थितीला तोंड देत आहेत. 

चिरंजीवी आणि त्यांच्या पत्नीनं ही गोड बातमी त्यांचे आप्तजन आणि काही खास मंडळींनाच सांगितली होती. येत्या काळात ते याबाबतची अधिकृत माहितीसुद्धा देणार होते. काही दिग्गज कलाकारांकडूनही त्यांनी आपल्या होणाऱ्या बाळासाठी शुभाशिर्वाद घेतले होते. पण, अखेर नियतीच्या मनात मात्र वेगळच होतं. 

वाचा : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्याचं वयाच्या ३९व्या वर्षी निधन

आनंदाच्या भरात असणाऱ्या या जोडीच्या वाट्याला असं काही दु:ख दिलं की ज्याची सर भरून काढणं केवळ अशक्यच. सध्याच्या घडीला चिरंजीवीच्या जाण्याचं वास्तव स्वीकारत त्यांच्या स्मृतींमध्ये रमणाऱ्या त्याच्या पत्नीविषयी चाहत्यांनीही सहानुभूतीची भावना व्यक्त करत या कठीण प्रसंगी एक कुटुंब म्हणून आपण मेघना यांच्यासोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला.