मुंबई : शनिवारी अनेक बॉलिवूड कलाकार मंडळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. खुद्द मोदींनीच आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने या या सेलिब्रिटी मंडळींनी त्यांची भेट घेत काही महत्त्वाच्य़ा मुद्द्यांवर चर्चा केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रम आणि उपक्रमांपैकीचाच हा एक समारंभ होता.
कलेच्या माध्यमातून विविध मार्गांनी गांधीजींचे विचार कशा प्रकारे सर्वांपर्यंत पोहोचवले जात आहेत आणि यापुढेही पोहोचवले जातील यावर या समारंभातून प्रकाश टाकण्यात आला. पंतप्रधानांनी यावेळी कलाकारांचं कौतुक केलं. या साऱ्यामध्ये दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील कोणताही चेहरा मात्र पाहायला मिळाला नाही. याला अपवाद ठरला दिल राजू यांचा. ज्यांना या कार्यक्रमांचं निमंत्रण होतं. पण, आता या मुद्द्यावर दाक्षिणात्य कलाविश्वातून आणि चाहत्यांच्या वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.
निमित्त ठरत आहे एक ट्विट. अभिनेता, दिग्दर्शक राम चरणची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी यांची सून उपासना कोनीडेलाने सोशल मीडियाच्या माध्यमातून याविषयीयं मत मांडलं.
मोदींना आपल्या पोस्टमध्ये टॅग करत तिने लिहिलं, 'माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी... आम्ही संपूर्ण दक्षिण भारतीय तुमच्याकडे आदराने पाहतो. तुमच्यासारखे पंतप्रधान लाभल्याचा आम्हाला अभिमानच आहे. पूर्ण आदराने मी एक बाब मांडू इच्छिते की, कला आणि सांस्कृतीक क्षेत्रातील काही दिग्गज आणि उल्लेखनीय मंडळींच्या उपस्थितीत फक्त हिंदी कलाकारांचीच हजेरी होती. यावेळी दाक्षिणात्य कलाविश्वाला वगळण्यात आलं होतं. या भावना व्यक्त करताना मला दु:ख होत आहे. पण, मला आशा आहे की, या मुद्द्याकडे अगदी योग्यतेने लक्ष दिलं जाईल..... जय हिंद', असं ट्विट करत तिने आपली भूमिका स्पष्ट केली.
Dearest @narendramodi ji.
JAI HIND https://t.co/bGWdICLnsn pic.twitter.com/DUzpgpbSYA— Upasana Konidela (@upasanakonidela) October 19, 2019
उपासनाने हे ट्विट केल्यानंतर तिच्या मतावर अनेकांनीच आपल्या प्रतिक्रिया देण्यासही सुरुवात केली. तिने अतिशय योग्य मुद्दा उपस्थित केल्याचं म्हणत अनेकांनीच ही बाब उचलून धरली. आता या गंभीर मुद्दयावर दाक्षिणात्य कलाविश्वातून आणि खुद्द पंतप्रधानांकडून काय उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.