मुंबई : भारतातील पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी आता काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. पण श्रीदेवी आणि 'हवाहवाई' हे मिस्टर इंडियामधील गाणं हे समीकरण कायमच राहणार आहे. आबालवृद्धांच्या ओठांवर असणारे हे गाणं काही अर्थहीन शब्दांनी सुरू होते.
'हवाहवाई' या गाण्याची सुरूवात ‘होलोलूलू, लस्सी पिसी, हस्सी तूसी..’ अशा ओळीने होते. पण ही नेमकी भाषा कोणती ? त्याचा अर्थ काय ? हे कोणाला समजत नाही.
'हवाहवाई' या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन सरोज खान यांनी केलं होतं. सरोज खान यांनी श्रीदेवींची या गाण्यातील एन्ट्री 'दमदार' करण्याचं ठरवलं होतं. अशातच श्रीदेवीच्या हातात पंखा,घोळदार ड्रेस आणि पाळण्यात उभं राहून जमिनीवर उतरणं या सार्या गोष्टी सांभाळून डान्सची सुरूवात करणं ही कसरतीची गोष्ट होती.
गाण्याच्या सुरूवातीला श्रीदेवींना सावरण्यासाठी काही वेळ मिळावा याकरिता सरोज खान यांनी जावेद अख्तर यांना काही ओळी लिहून देण्याची मागणी केली.
मै खाँबो की शहझादी या शब्दांनी गाण्याची सुरूवात होते. त्याच्या आधी अपेक्षित ओळी सुचत नव्हत्या. त्यामुळे नेमके काय लिहावे हे समजत नसल्याने त्यांनी ‘होलोलूलू, लस्सी पिसी, हस्सी तूसी..’ अशा ओळी लिहल्या. गायिका कविता कृष्णमुर्ती यांनी देखील या ओळी अशा गायल्या की अर्थहीन असूनही त्या ओळी गाण्यापेक्षा वेगळ्या वाटत नाहीत.
सरोज खान यांनी या गाण्याचा खास किस्सा काही दिवसांपूर्वी रसिकांसोबत शेअर केला होता.