नवी दिल्ली : बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं २४ फेब्रुवारी २०१८ रोजी निधन झालं. श्रीदेवी यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वासह चाहत्यांनाही धक्का बसला. बाथटबमध्ये बुडून मृत्यू झालेल्या श्रीदेवी यांच्या निधनाला १ वर्षाहून अधिक काळ गेला असताना, आता त्यांच्या निधनाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयपीएस अधिकारी आणि केरळ डीजीपी जेल ऋषिराज सिंह यांनी याबाबत खळबळजनक दावे केले आहेत.
ऋषिराज सिंह यांनी केरळच्या वर्तमानपत्रामध्ये एक कॉलम लिहिला आहे. त्यात त्यांनी 'श्रीदेवी यांचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाला नसून त्यांची हत्या करण्यात आली असल्याचं' म्हटलं आहे. ऋषिराज सिंह यांचे जवळचे मित्र आणि फॉरेंसिक एक्सपर्ट दिवंगत डॉ. उमादथन यांच्या हवाल्यानुसार त्यांनी हा दावा केला आहे.
ऋषिराज सिंह यांनी 'ज्यावेळी मी माझा मित्र आणि फॉरेंसिक एक्सपर्ट दिवंगत डॉ. उमादथन यांना श्रीदेवी यांच्या मृत्यूविषयी विचारणा केली, त्यावेळी त्यांनी श्रीदेवी यांचा मृत्यू ही हत्या असू शकते, असं म्हटल्याचं' सांगितलं आहे.
डॉ. उमादथन यांनी या मृत्यूविषयी काही दावे केले. 'कोणतीही व्यक्ती कितीही नशेत असली तरी, ती एक फूट पाण्यात बुडू शकत नाही. ती व्यक्ती एक फूट पाण्यात तेव्हाच डूबू शकते ज्यावेळी कोणी दोन्ही पाय पकडून, डोकं पाण्यात बुडवून त्या व्यक्तीला बुडवण्याचा प्रयत्न करेल' असा दावा त्यांनी केला आहे.
श्रीदेवी यांच्या शवविच्छेदन अहवालात, त्यांचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाल्याचं सांगण्यात आलं होतं.
२४ फेब्रुवारी २०१८ मध्ये श्रीदेवी आपल्या पुतण्याच्या लग्नासाठी कुटुंबासमवेत दुबईमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी अचानक बाथटबमध्ये बुडून त्यांचं निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली.