मुंबई : बॉलिवूडच्या किंग खानने स्क्रीन आणि त्याच्या चाहत्यांपासून बरेच दिवस अंतर ठेवले होते. मात्र पुन्हा एकदा तो कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या आगामी पठाण सिनेमाची पहिली झलक पाहायला मिळाली.
त्याच वेळी, एका नवीन जाहिरातीमध्ये सुद्धा तो नवीन हेअरस्टाईल फ्लॉंट करताना दिसला. अलीकडेच शाहरुख खान एका कंपनीचं प्रमोशन करताना दिसला. या जाहिरातीमध्ये त्याची मुलगी सुहानाची देखील झलक पाहायला मिळाली अशी चर्चा सध्या जोर धरत आहे.
अनेकांना यावरुन वाटत आहे की या जाहिरातीत सुहानाने वडिल शाहरुख खान यांच्यासोबत काम केले आहे. पण तसं काही झालेलं नाही.
या जाहिरातीत सुहाना दिसत नसून व्हिडिओच्या बॅकग्राऊंटला तिचा आवाज ऐकू येत असल्याचं बोललं जात आहे. या जाहिरातीत दाखवण्यात आले आहे की शाहरुख खानला सुहाना कॉल करते.
शाहरुख कॉल उचलतो आणि तिला शूटमध्ये असल्याचं सांगतो. सुहाना आणि शाहरुख खानचा संवाद ही या व्हिडिओत ऐकायला मिळतो.
शाहरुखच्या जाहिरातीत सुहानाचा आवाज वापरण्यात आल्यामुळे अशी ही चर्चा सुरु झाली आहे की तो सुहाना बॉलिवूड लॉन्च देखील करु शकतो. करण जोहर नव्हे तर खुद्द शाहरुख लेकीसाठी निर्माता बनू शकतो,अशी चर्चा आहे.
आर्यन खानने 'द लायन किंग' मधून ऑडिओ इंडस्ट्रीत पदार्पण केले आहे, तर या जाहिरातीत पहिल्यांदाच सुहाना खानचा आवाज ऐकायला मिळत आहे.
बॉलीवूडमध्ये ती कधी पाऊल ठेवणार आहे, याचे उत्तर मिळणे सध्या खूप कठीण आहे. त्याचवेळी शाहरुख खानचे चाहते त्याच्या पठाण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.