राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या सुमित्रा भावे यांचं निधन

सुमित्रा भावे यांनी  वयाच्या 78व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 

Updated: Apr 19, 2021, 09:42 AM IST
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या सुमित्रा भावे यांचं निधन

मुंबई : प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी  वयाच्या 78व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी सकाळी पुण्यातील एका खासगी रूग्णालयात त्यांनी या जगचा निरोप घेतला. सुमित्रा भावे यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील सांस्कृतिक-सामाजिक विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अशा अचानक जाण्याने सिनेसृष्टीला मोठं नुकसान झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे त्या एक समाज अभ्यासक देखील होत्या. 

सुमित्रा यांच्या 'बाई', 'पाणी' हे दोन लघुपटं चांगलीचं गाजली. या लघुपटांना मिळालेल्या यशानंतर त्यांनी 'दोघी' हा चित्रपट 1995 साली तयार केला. 'दहावी फ', 'वास्तुपुरुष', 'देवराई', 'बाधा', 'नितळ', 'एक कप च्या', संहिता, 'घो मला असला हवा', 'कासव', 'अस्तु' या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सुमित्रा यांनी उत्तम रित्या पार पाडली.

त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेविश्वाला मोठा धक्का बसला आहे. सुमित्रा यांच्या कित्येक चित्रपटांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. सोनाली कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर अशा अनेक कलाकारांना सुमित्रा भावे यांच्याकडे सिनेमाचे धडे गिरवता आले.