... म्हणून सौंदर्या रजनीकांतकडून मुलासोबतचा फोटो डिलीट

 तिच्या काही पोस्ट चर्चेचा विषयही ठरतात. पण....

Updated: Jul 2, 2019, 05:11 PM IST
... म्हणून सौंदर्या रजनीकांतकडून मुलासोबतचा फोटो डिलीट

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे. तिच्या काही पोस्ट चर्चेचा विषयही ठरतात. पण, यावेळी मात्र सोशल मीडिया पोस्टमुळे ती चांगलीच प्रकाशझोतात आली आहे किंबहुना ती अडचणीत आली आहे. 

सौंदर्याने नुकतंच मुलगा वेद याच्यासोबता स्विमिंग पूलमधील एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोसोबत तिने एक कॅप्शनही लिहिलं होतं. लहान वयातच त्यांना शिकवा.... ते स्वत:हून चमकतील (उत्कृष्ट कामगिरी करतील) असं तिने या कॅप्शनमध्ये लिहिलं. जलतरण म्हणजेच स्विमिंग किती महत्त्वाचं आहे हेसुद्धा तिने या पोस्टच्या माध्यमातून पटवून दिलं. पण या फोटोवर मात्र काही अनपेक्षित प्रतिक्रिया आल्या. 

चेन्नईत भयंकर पाणीसंकट असताना सौंदर्याचा स्विमिंग पूलमधील हा अंदाज काही नेटकटऱ्यांच्या पचनी पडला नाही. त्यामुळे अनेकांनीच तिच्यावर थेट शब्दांत टीका केली. या फोटोवर येणाऱ्या प्रतिक्रिया आणि एकंदर होणारा विरोध पाहता अखेर सौंदर्याने तो फोटो डिलीट केला. 

'अतिशय सकारात्मक दृष्टीने पोस्ट केलेले ते फोटो आम्ही सामोरं जात असणाऱ्या पाणीसंकटाचं गांभीर्य पाहता डिलीट करण्यात आले आहेत', असं तिने ट्विट करत स्पष्ट केलं. मुलांमध्ये लहान वयातच शारीरिक कसरतीचे प्रकार किती फायद्याचे आणि महत्त्वाचे असतात हीच बाब अधोरेखित करण्यासाठी हे फोटो पोस्ट करण्यात आल्याचं तिने स्पष्ट केलं.  या ट्विटमध्ये तिने #LetsSaveWater असा हॅशटॅगही जोडला. त्यामुळे तिने नेटकऱ्यांच्या रोषाकडेही सकारात्मकपणे पाहिल्याचं या ट्विटमधून स्पष्ट होत आहे.