मुंबई : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'जबरिया जोडी' या चित्रपयाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच या ट्रेलरला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. तरुणाईच्या जवळ जाणारी पात्र आणि त्यांचा अंदाज पाहता आता आतापासूनच या चित्रपटाची लोकप्रियता पाहायला मिळत आहे.
उत्तर भारतीय भूमिकांमध्ये परिणीती आणि सिद्धार्थचा अंदाज विशेष लक्षवेधी ठरत आहे. पेहरावापासून त्यांच्या भाषेपर्यंत बरेच बारकावे चित्रपटात टीपण्यात आल्याचं ट्रेलर पाहता लक्षात येत आहे. त्यामुळे 'जबरिया जोडी' खऱ्या अर्थाने प्रेक्षकांसाठी 'परफेक्ट एंटरटेंमेंट पॅक' ठरणार असं म्हणायला हरकत नाही.
प्रशांत सिंह दिग्दर्शित या चित्रपटातून बिहारमधील लग्नसंस्था आणि काही घडामोडींचा आधार घेत या चित्रपटाचं कथानक साकारण्यात आलं आहे. ज्यामध्ये विनोदी बाजही पाहता येणार आहे. याचविषयी अधिक माहिती देत ते म्हणाले होते, 'बिहारमध्ये पूर्वापारपासून चालत आलेल्या काही गोष्टींमध्ये नवरदेवाचं अपहरण होणं, हीसुद्धा एक बाब आहे. याविषयी अनेकांना माहितीही आहे. पण, अपहरण नेमकं का झालं, याची माहिती मात्र कोणालाच नसते. त्यामुळे हे कारण जाणणंच त्यांच्यासाठी उत्सुकतेचं आणि तितक्याच कुतूहलाचंही असेल.
'जबरिया जोडी' या चित्रपटाच्या निमित्ताने परिणीती चोप्रा पुन्हा एकदा रावडी आणि दिलखुलास अंदाजात दिसत आहे. तर, 'स्टुडंट' सिद्धार्थसुद्धा बिहारी युवकाच्या भूमिकेत धमाल करताना दिसत आहे. त्यामुळे आता ही 'जबरिया जोडी' बॉक्स ऑफिसवर कितपत गाजते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. २ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.