मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणारे आहे. 2 ऑक्टोबर रोजी त्याला एनसीबीने ताब्यात घेतले. त्यानंतर आता आर्यनच्या कोठडीत वाढ होईल की त्याला दिलासा मिळेल हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान आर्यनला समर्थन देण्यासाठी अनेक सेलिब्रिटी पुढे येत आहेत. त्यानंतर आता दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वकील विकास सिंह आर्यनच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत. त्यामुळे आता आर्यनला मिळेल दिलासा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे वकील विकास सिंह यांनी एनडीटीव्हीला सांगितले की नारकोटिक्सचा कायदा पूर्णपणे जप्तीवर अवलंबून आहे. जर एखाद्या व्यक्तीकडून ड्रग्स मिळाले नाहीत तर त्याला ताब्यात ठेवणे कायद्याचे उल्लंघन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे विकास सिंह यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ आरोपींच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. आर्यन खानची गुरूवारची रात्रही जेलमध्येच गेली. आर्यनसह 8 आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आल्यानं गुरूवारही त्याला जेलमध्येच मुक्काम करावा लागला. शुक्रवारी रात्री आठही आरोपी NCB कोठडीत होते मात्र NCBला आरोपींची चौकशी करायला मनाई करण्यात आली होती.