मालिकेतील कुठला भाग दाखवायचा याचे सर्व अधिकार झी मराठी वाहीनीचे - अमोल कोल्हे

स्वराज्यरक्षक संभाजी मालिका आता अंतिम टप्प्यात आली आहे.

Updated: Feb 23, 2020, 10:29 AM IST
मालिकेतील कुठला भाग दाखवायचा याचे सर्व अधिकार झी मराठी वाहीनीचे - अमोल कोल्हे
स्वराज्यरक्षक संभाजी

हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : झी मराठी वाहिनीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील शेवटचा भाग, अर्थात महाराजांच्या हत्येचा भाग वगळण्यात यावा या शिवसेना नेते अर्जुन खोतकरांच्या मागणीवर अभिनेते अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनीने जबाबादारीने आणि नैतिक कर्तव्यभावनेने ही मालिका केली आहे. 

झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेने गेली अडीच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पण ही मालिका आता शेवटच्या टप्प्यात आली असून महाराजांची ज्या कृरतेने हत्या केली ते पाहण्याची ताकद नसून राजकीय सलोखा बिघडेल असे मालिकेचे काही भाग दाखवू नये अशी शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मागणी केली होती.

अर्जुन खोतकर यांच्या भावनेविषयी आदर असल्याचंही कोल्हे यांनी म्हटलंय. मालिकेत मुळातच काळजी घेण्यात आली असून कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता  नाही असंही कोल्हे म्हणाले आहेत. मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी झी मराठी वाहिनीचा असेल असंही अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे.