अभिनेत्री तेजश्री प्रधानचं 'या' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण

तेजश्रीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री...

Updated: Feb 10, 2020, 08:53 PM IST
अभिनेत्री तेजश्री प्रधानचं 'या' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण
फाईल फोटो

मुंबई : झी मराठीवरील 'अग्गबाई सासूबाई' मालिकेतील शुभ्राची भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिच्या शुभ्रा या खास भूमिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे. एका उत्कृष्ट मराठमोळ्या सुनेची भूमिका साकारणारी तेजश्री लवकरच रुपेरी पडद्यावर भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. तेजश्री आगामी 'बबलू बॅचरल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तेजश्रीने नुकतंच सोशल मीडियावर 'बबलू बॅचरल'चं पोस्टर शेअर केलं आहे. 

'बबलू बॅचरल'मध्ये तेजश्री प्रधान, अभिनेता शर्मन जोशीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटापूर्वी तेजश्री आणि शर्मन या दोघांनी हिंदी नाटकात एकत्र काम केलं आहे. अग्निदेव चटर्जी यांनी 'बबलू बॅचरल' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, येत्या २० मार्च रोजी 'बबलू बॅचरल' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

 
 
 
 

A post shared by Tejashri Pradhan (@tejashripradhan) on

सध्या 'अग्गबाई सासूबाई' या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधानने 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केला आणि पाहता पाहता प्रेक्षकांनी या मालिकेला डोक्यावर उचलून धरलं. मालिकेतील नाविन्य, त्याची आगळी-वेगळी कथा, मालिकेचं वेगळं टेकिंग, निवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडी, इत्यादी. या सगळ्यामुळे मालिकेने अल्पशा कालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे.

तेजश्री प्रधान 'होणार सून मी या घरची' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली. श्री-जान्हवी अर्थात तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांची जोडी चांगलीच लोकप्रिय झाली होती. आता तेजश्रीच्या शुभ्रा भूमिकेलाही जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे आता 'बबलू बॅचरल'मधून तेजश्री चाहत्यांची मनं जिंकणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.