'सुरेश धस, क्षीरसागर या प्रकरणात...', 'मुलगा निर्दोष' म्हणत वाल्मिकच्या आईचा आरोप

Walmik Karad Mother: वाल्मिक कराडला आज परळीमधून केज येथील कोर्टासमोर हजर करण्यात आलं आहे. असं असतानाच त्याच्या आईने ठिय्या आंदोलन करत काही विधानं केली आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 14, 2025, 12:42 PM IST
'सुरेश धस, क्षीरसागर या प्रकरणात...', 'मुलगा निर्दोष' म्हणत वाल्मिकच्या आईचा आरोप title=
पोलीस स्टेशनसमोर आंदोलन

Walmik Karad Mother: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशीसंबंधित खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडची कोठडी आज संपत असल्याने त्याला आज केज कोर्टात केलं जाणार आहे. खंडणीच्या गुन्ह्यात कोठडी संपत असली तरी खून प्रकरणात वाल्मिकचा पाय आणखी खोलात जात असताना दिसत आहे. अशातच आता वाल्मिक कराडला परळीमधून केज कोर्टात घेऊन जात असतानाच त्याची आई पारुबाई बाबुराव कराड यांनी ठिय्या आंदोलन करत मुलाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

माझ्या मुलावर अन्याय

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित आवादा कंपनीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मीक कराडवर अन्याय होत असल्याचा दावा तिच्या आईने केला आहे. माझ्या मुलाला न्याय द्या, अशी मागणी करत वाल्मीक कराडच्या आईने परळी पोलीस ठाण्यात आज सकाळपासूनच ठिय्या आंदोलन करत आहेत.

75 वर्षीय पारुबाई कराड यांचं ठिय्या आंदोलन

दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा खोटा गुन्हा असून गलिच्छ राजकारणामुळे माझ्या मुलावर अन्याय केला जात आहे. त्याच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्या व माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी करत वाल्मीक कराड यांच्या 75 वर्षीय पारुबाई कराड यांनी केला आहे. सकाळपासून त्या परळी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत आहेत.

नक्की पाहा हे फोटो >> 40+ एकर जमीन, 8 घरं, 5 लाखांची गुरं अन् एकूण संपत्ती.. सुरेश धस किती श्रीमंत आहेत पाहिलं का?

धस आणि क्षीरसागर यांचा उल्लेख

माझ्या लेकरावर झालेला अन्याय दूर करा त्याच्यावर दाखल झालेले सगळे गुन्हे खोटे आहेत असे वाल्मिक कराडच्या आईने म्हटलं आहे. "सुरेश धस, संदीप क्षीरसागर हे या प्रकरणात राजकारण करत असल्याचा आरोप देखील उपस्थित महिला सांगत आहेत," असं पारुबाई कराड यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> 'सुरेश धसांना 2 बायका...', एकेरी उल्लेख करत सदावर्ते भिडले! म्हणाले, 'धनंजय मुडेंनी 5 अपत्य..'

संतोष देशमुखांच्या पत्नीचा जबाब वाल्मिकला अडचणीत आणणार?

वाल्मीक कराडने हत्येच्या महिनाभर आधी संतोष देशमुख यांना धमकी दिली असल्याचा जबाब संतोष देशमुख यांच्या पत्नीने दिला आहे. त्यामुळं महिनाभर संतोष देशमुख सतत ताणावात होते असेही पत्नीने जवाब म्हटलेलं आहे. त्यामुळे वाल्मीक कराडच्या अडचणी आज वाढू शकतात. हत्येच्या गुन्ह्यात सहभाग यावर सरकारी वकील काय भूमिका मांडतात यावर आज वाल्मिक कराडला जामीन मिळणार की पुन्हा कोठडी मिळणार हे ठरणार आहे.

वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक 

दरम्यान, दुसरीकडे परळीत वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झाले आहेत. राणी लक्ष्मीबाई टॉवरवर समर्थक चढले असून जोरदार घोषणाबाजी करत आहेत. परळीत दोन ठिकाणी कराड समर्थकांचे आंदोलन सुरु आहे. त्यामुळेच पोलीस ठाण्यासमोर कराडच्या आईचे तर टॉवरवर चढून समर्थकांचे आंदोलन सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x