VIDEO : अनुष्कासोबतच्या नात्याविषयी अखेर प्रभास म्हणाला....

'बाहुबली' या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी प्रकाशझोतात आली 

Updated: Dec 18, 2018, 11:27 AM IST
VIDEO :  अनुष्कासोबतच्या नात्याविषयी अखेर प्रभास म्हणाला....

मुंबई : 'बाहुबली' या चित्रपटाच्या निमित्ताने भारतीय कलाविश्वात भव्यतेच्या नव्या व्याख्या प्रस्थापित झाल्याचं पाहायला मिळालं. कमाईचे आकडे म्हणू नका किंवा मग चित्रपटाने केलेले विक्रम म्हणू नका. प्रत्येक बाबतीत 'बाहुबली'ने अनेकांनाच थक्क करुन सोडलं. अशा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रभास, राणा डग्गुबती, अनुष्का शेट्टी हे चेहरे प्रकाशझोतात आले आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवून गेले. 

'बाहुबली'च्या निमित्ताने प्रभास तर असंख्य तरुणींच्या गळ्यातील ताईत झाला. पण, एकिकडे त्याच्या आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिच्या नात्याविषयीही बऱ्याच चर्चा रंगल्यामुळे प्रभासच्या फिमेल फॅन्समध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळाली. स्वप्नांचा राजकुमार असावा तर असा, असं म्हणत प्रभासकडे पाहण्याऱ्या याच चाहत्यांना आता त्याच्या रिलेशनशिपमागचं खरं सत्य कळणार आहे. 

'कॉफी विथ करण'च्या सहाव्या पर्वात खुद्द प्रभासनेच त्याच्या आणि अनुष्काच्या नात्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देत सर्वांचच लक्ष वेधलं आहे. स्टार वर्ल्डच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या शो चा एक प्रोमो व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून त्यामध्ये 'बाहुबली'साठी ओळखलं जाणारं त्रिकूट म्हणजेच, राणा डग्गुबती, प्रभास आणि दिग्दर्शक एस.एस.राजामौली दिसत आहेत. 

आपल्याला हव्या त्या प्रश्नांची उत्तरं वदवून घेण्यात तरबेज असणाऱ्या करण गप्पांच्याच ओघात प्रभासला अनुष्कासोबतच्या त्याच्या नात्याविषयी विचारण्यात आलं. त्यावेळी अनुष्कानेच त्याविषयीच्या अफवांना वाव दिला, त्यांची सुरुवात केली असं प्रभास पटकन म्हणताना दिसत आहे. त्याच्या या उत्तरावर राजामौली, राणा आणि खुद्द करणलाही हसू आवरत नसल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. 

प्रभासवर होणारा प्रश्नांचा मारा, राजामौलींकडून राणा आणि प्रभासची होणारी पोलखोल आणि गप्पांचा रंगलेला फड ही सारी धमाल 'कॉफी विथ करण'च्या नव्या भागात पाहता येणार आहे. सध्याच्या घडीला या कार्यक्रमाचा प्रोमो पाहायला मिळत आहे. त्यामुळे 'पिक्चर अभी बाकी है', असं म्हणायला हरकत नाही.