'केसरिया' गाणं रिलीज होताच सापडलं वादाच्या भोवऱ्यात

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटातील पहिलं गाणं केसरिया रविवारी रिलीज झालं.

Updated: Jul 18, 2022, 07:36 PM IST
'केसरिया' गाणं रिलीज होताच सापडलं वादाच्या भोवऱ्यात title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटातील पहिलं गाणं केसरिया रविवारी रिलीज झालं. हे गाणं रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. केसरिया हे गाणं प्रसिद्ध गायक अरिजित सिंगने आपल्या सुंदर आवाजात गायलं आहे. तर संगीत प्रीतमने दिलं आहे. दरम्यान, केसरिया गाणं त्याच्या संगीतामुळे ट्रोल्सच्या निशाण्यावर आलं आहे. अनेक सोशल मीडिया यूजर्स चित्रपटाचे निर्माते आणि प्रीतम यांच्यावर संगीताची नक्कल केल्याचा आरोप करत आहेत.

एका सोशल मीडिया युजर्सने केसरियाच्या सुरांचं वर्णन केलं आहे. ट्विटरवरील एका युजर्सने वडाली ब्रदर्स दिवंगत लखविंदर वडाली आणि पूरण वडाली यांचं चरखा नावाचं लोकगीत शेअर केलं असून केसरिया गाण्याचं कोरस वडाली ब्रदर्सच्या संगीतातून कॉपी केल्याचा आरोप केला आहे. मात्र, या आरोपांबाबत ब्रह्मास्त्र आणि प्रीतम चित्रपटाच्या निर्मात्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

ब्रह्मास्त्र या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर, या चित्रपटाचा ट्रेलर याआधी प्रदर्शित झाला होता. जो चांगलाच पसंत केला जात होता. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन अक्किनेनी यांच्यासह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जीने केलं असून चित्रपटाचं बजेटही 600 कोटींहून अधिक असल्याचं बोललं जात आहे. ब्रह्मास्त्र हिंदीसोबतच कन्नड, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित होत आहे. ब्रह्मास्त्र हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार आहे.