Twinkle Khanna Reveals Reason For Marrying Akshay Kumar: बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) ही तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. सोशल नेटवर्किंगवर ट्विंकल खन्ना फार सक्रीय असून अनेकदा तिच्या कमेंट्स आणि पोस्ट लक्ष वेधून घेतात. अनेकदा ती सोशल मीडियावर मजेदार फोटो पोस्ट करत असते. आजच्या 'फादर्स डे'निमित्त (Fathers Day) तिने अशीच एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने आपल्या पतीचा म्हणजेच अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये ट्विंकलने अक्षयवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या पोस्टमध्ये अभिनेता अक्षय कुमारला सर्वोत्तम वडील असं म्हटलं आहे. तसेच ट्विंकलने अक्षय कुमारबरोबर का लग्न केलं याबद्दलही भाष्य केलं आहे.
ट्विंकल खन्नाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती शर्टलेस अक्षय कुमारच्या बाजूला उभी असल्याचं दिसत आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये ट्विंकलने, "अक्षय कुमारबरोबर लग्न करण्याचं एक कारण हे होतं की मला ठाऊक होतं तो एक चांगला वडील ठरु शकतो. तो माझ्या कुटुंबाबरोबर कसा वागतो हे मी फार जवळून पाहिल्याने मला ही खात्री होती. दुसरी गोष्ट ही होती की मला अपेक्षा होती माझ्या मुलांमध्ये त्याच्यातील काही जीन्स (अनुवंशिक गुणधर्म) माझ्या मुलांमध्ये दिसतील. आता मी त्याला जेव्हा त्याच्या वयाच्या पन्नाशीमध्ये पाहते तेव्हा फार गर्व होतो की माझ्या मुलांमध्ये त्याचे अर्धे गुणधर्म आहेत," असं म्हटलं आहे. "स्वत:च्या आधी कुटुंबाचा विचार करणाऱ्या या वयक्तीला शुभेच्छा," असं पोस्टच्या शेवटची ट्विंकलने म्हटलं आहे.
ट्विंकलची ही पोस्ट पाहून अक्षय कुमारनेही यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. "या पोस्टसाठी तुला फार सारं प्रेम. तू लूक्ससाठी जेनेटिक्सला महत्त्व दिलं आहे तर मुलांमधील समजूतदारपणा आणि बुद्धीचे गुण तुझ्याकडून आलेत असं मी मानतो. त्यांना अनेक पुस्तक वाचवण्यासाठी प्रेरणा देत राहा," असं अक्षयने कमेंटमध्ये म्हटलं आहे. अनेक कलाकारांनीही या पोस्टवर कमेंट करुन ही पोस्ट फारच सुंदर असल्याचं म्हटलं आहे.
या दोघांमधील ही चर्चा चाहत्यांना आवडली असून या पोस्टवर लाखोंच्या संख्येनं तर अक्षयच्या कमेंटवर हजारोंच्या संख्येनं लाईक्स आले आहेत. अनेकांनी तुम्ही दोघे उत्तम जोडपं तर आहातच पण चांगले पालकही आहात असं म्हणत ट्विंकल आणि अक्षयचं कौतुक केलं आहे.