Madhubala Birth Anniversary : मधुबाला... हिंदी कलाजगताला पडलेलं आरस्पानी सौंदर्याचं एक अनोखं आणि अद्भूत स्वप्न. असं वर्ण करणं अतिशयोक्ती ठरणार नाही. हिंदी सिनेसृष्टीमध्ये एक काळ गाजवत अनेक आव्हानांचा सामना करत आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या बळावर या अभिनेत्रीनं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. मधुबाला यांच्या रुपावर अनेकजण आजही भाळतात, तर मग त्या काळात नेमकी काय परिस्थिती असेल याचा विचारच करा.
अनेक अभिनेत्री शर्यतीत असतानाही मधुबाला यांनी त्यांचं वेगळेपण जपलं होतं. अतिशय कमी आयुर्मान लाभलेल्या या अभिनेत्रीच्या अखेरच्या जीवनात तिची परिस्थिती अनेकांच्याच डोळ्यात पाणी आणून गेली. नियतीचा खेळ पाहा, ज्या दिवशी सारं जग प्रेमाचा दिवस साजरा करत असतं तोच दिवस म्हणजे या अभिनेत्रीचा वाढदिवस. 14 फेब्रुवारी 1933 (Valentines Day) चा मधुबाला यांचा जन्म.
मधुबाला यांनी त्या काळात गाजवलेली फॅशन आजही अनेक सौंदर्यवतींसाठी मैलाचा दगड. अशा या अभिनेत्रीला प्रेमाच्या बाबतीत मात्र नशिबानं कायमच चकवा दिला. आजही जेव्हाजेव्हा मधुबाला यांच्या प्रेमाच्या नात्याविषयी बोललं जातं तेव्हातेव्हा त्यांचं गायक आणि अभिनेते किशोर कुमार यांच्याशी असणारं वैवाहिक नातं आणि अभिनेतेर दिलीप कुमार यांच्यासोबतचं प्रेमाचं नातं अशीच चर्चा होते. दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या प्रेमाची सर्वांनाच माहिती. पण, तुम्हाला माहितीये का, या अभिनेत्यापूर्वी एका बड्या कलाकारावर मधुबाला भाळल्या होत्या. असं म्हणतात की या व्यक्तीवर त्या जीवापाड प्रेम करत होत्या.
1949 मध्ये 'महल' चित्रपटाच्या निमित्तानं दिग्दर्शक कमाल अमरोही यांनी दिलीप कुमार आणि मधुबाला यांना मुख्य भूमिकेसाठी निवडलं. हा चित्रपट कमाल गाजला, मधुबाला रातोरात प्रसिद्धीझोतात आल्या. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मधुबाला आणि कमाल अमरोही बराच वेळ एकत्र व्यतीत करू लागले. मधुबाला यांनी अखेर या दिग्दर्शकाकडे आपल्या मनीचे भाव व्यक्त करत प्रेमाची कबुली दिली.
असं म्हणतात की मधुबाला यांनी लग्नासाठी आग्रह धरण्यास सुरुवात केली आणि तिथूनच हे नातं तुटण्यास सुरुवात झाली. असंही सांगितलं जातं की हे सर्व अमरोहींच्या आयुष्यात असणाऱ्या मीना कुमारी यांच्या कानी पडलं तेव्हा त्यांचा संताप अनावर झाला. नातं तुटण्याच्या भीतीपोटी त्या मधुबालाचा द्वेष करू लागल्या होत्या. काही ठिकाणी असेही संदर्भ आहेत की, कुटुंबाला सोडून आपल्यासोबत संसार थाटण्याच्या मधुबाला यांच्या अटीला अमरोही यांनी झिडकारत या नात्यात दुरावा पत्करला होता. कहाण्या आणि किस्से अनेक पैलूंच्या रुपात समोर येतात पण, मधुबाला यांचं अमरोही यांच्यावर असणारं प्रेम मात्र कोणीही नाकारलेलं नाही.