पाहा : बिग बींची 'ती' हरवलेली वस्तू शोधण्यासाठी एकवटली सेलिब्रिटींची 'फॅमिली'

मस्त चाललंय यांचं....   

Updated: Apr 7, 2020, 11:34 AM IST
पाहा : बिग बींची 'ती' हरवलेली वस्तू शोधण्यासाठी एकवटली सेलिब्रिटींची 'फॅमिली'
फॅमिली

मुंबई : कोरोना Coronavirus व्हायरसचा विळखा वाढत असताना म्हणून संपूर्ण देश, देशच नव्हे तर अर्ध्याहून अधिक जगभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. परिणामी सर्वजण आपआपल्या घरांमध्ये किंवा जिथे आसरा मिळाला आहे, त्या ठिकाणी सुरक्षित आहेत. पण, इथे भारतीय कलाकारांमध्ये मात्र या क्षणी एकच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. 

सोशल मीडियावर सध्या ही दिग्गज, नवोदित, विविधभाषी अशा कलाकारांची 'फॅमिली' गाजण्याचं कारण ठरत आहे तो म्हणजे एक व्हिडिओ. कोरोना व्हायरसच्या काळातच आता बिग बी अमिताभ बच्चन यांचा काळया रंगाचा चष्मा हरवला. ज्यामुळे त्यांनी दिलजित दोसांज, रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट यांना कामाला लावलं. 

नव्या जोमाच्या या मंडळींनी थेट ममूथी, मोहनलाल, रजनीकांत आणि चिरंजीवी यांच्याकडे त्यासाठी मदत मागितली. रणबीर आणि दिलजितला हा सारा गोंधळ पाहून मराठमोळ्या सोनाली कुलकर्णी हिनंही त्यांनी चांगलीच ताकिद दिली. बरं सरतेशेवटी सर्वांच्याच प्रयत्नांनी हा चष्मा मिळाला आणि बिग बींच्या चेहऱ्यावर हसू आलं. गोष्टीचा शेवट झाला खरा. पण, यातही एक ट्विस्ट आहे बरं. 

कारण, या सर्वच कलाकार मंडळींनी त्यांच्याच घरी राहून महानायकाला त्यांचा चष्मा मिळवून दिला आहे. अर्थात सेलिब्रिटींनी आपआपल्या घरातून चित्रीकरण करत 'फॅमिली- A Made At Home Short Film',  सर्वांसमक्ष आणत लॉकडाऊनच्या काळात घरात राहणं किती महत्त्वाचं आहे हे पटवून दिलं आहे. 

अतिशय कलात्मक आणि तितक्याच अनोख्या अंदाजात सेलिब्रिटींनी कलाविश्वात रोजंदारी भत्त्यावर काम करणाऱ्यांसाठीही मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांची ही भूमिका पाहता, आणि हा संकटाचा काळही टळेल असं म्हणाणारे बिग बी पाहता एक सुखद दिलासा मिळत आहे.