World Cup 2019 : उपांत्य सामन्यातील पराभवानंतर कोण ठरतंय आमिरच्या टीकेचं धनी?

बॉलिवूडकरांनी पराभवानंतर दिल्या 'या' प्रतिक्रिया

Updated: Jul 11, 2019, 08:51 AM IST
World Cup 2019 : उपांत्य सामन्यातील पराभवानंतर कोण ठरतंय आमिरच्या टीकेचं धनी? title=

मुंबई : मँचेस्टर येथे पार पडलेल्या यंदाच्या क्रिकेट विश्वचषकातील उपांत्य सामन्याच भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंडच्या संघाकडून पराभवाचा स्वीकार करावा लागला. निसटती का असेना, पण भारतीय संघाने या सामन्यात विजयी छाप पाडावी अशीच क्रीडा रसिकांची अपेक्षा होती. पण, ही गणितं चुकली आणि सर्व गडी बाद होत विराटसेना १८ धावांनी किवींच्या संघाकडून पराभूत झाली. 

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक स्पर्धेत उतरलेल्या भारतीय संघाचा हा पराभव खरंतर अनेकांनाच निराश करुन गेला. पण, या पराभवाकडे सकारात्मक दृष्टीने पाहात सर्वांनीच या स्पर्धेतील संघाच्या आतापर्यंतच्या कामगिरीची प्रशंसा केली. यामध्ये बॉलिवूड कलाकारही मागे नाहीत. 

हरलो तर काय झालं... असं म्हणत कलाकारांनी संघातील खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवत आतापर्यंतच्या खेळाबद्दल त्यांची प्रशंसा केली. शिवाय त्यांचे आभारही मानले. 

'परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान याने सामन्याच्या पराभवासाठी पावसाला दोष देत एका सर्वसामान्य क्रिकेट रसिकाप्रमाणे आपलं मन मोकळं केलं. 'काल म्हणजेच मंगळवारच्या दिवशी पाऊस पडला नसला तर आज (बुधवारी) चित्र काही वेगळं असतं.... असो भारतीय संघ चांगला खेळला, आम्हाला तुमचा गर्व वाटतो', असं त्याने ट्विटमध्ये लिहिलं. एका अर्थी पाऊसच आमिरच्या टीकेचा धनी ठरला असं म्हणायला हरकत नाही. 

विनोदवीर सुनील ग्रोव्हरने न्यूझीलंडच्या संघाच्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाची प्रशंसा केली. तर, ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनीही किवींच्या संघाचं कौतुक केलं. 

भारतीय क्रिकेट संघाचे आभार मानत त्यांच्यामुळे आज एका लहान मुलाप्रमाणे उत्साहाच्या भरात अक्षरश: किंचाळत सामन्याचा आनंद घेतल्याचं अभिनेता मोहम्मद झिशान आयुब याने ट्विट करत सांगितलं. तर, वरुण धवन याने भारतीय संघाप्रती आपल्याचा आदर असल्याची भावना व्यक्त केली.