'झपाटलेला' चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेता काळाच्या पडद्याआड

'ओम फट् स्वाहा' मृत्युंजय मंत्र देणाऱ्या 'बाबांनी' जगाचा घेतला निरोप

Updated: Feb 5, 2021, 01:18 PM IST
'झपाटलेला' चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेता काळाच्या पडद्याआड title=

मुंबई: झापटलेल्या सिनेमातून घराघरात पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्याचं निधन झालं आहे. झपाटलेल्या चित्रपटातून तात्या विंचूला विचित्र मंत्र देणाऱ्या बाबांचं निधन झालं आहे.  'ओम भगभूगे भगनी भागोदरी ओम फट् स्वाहा' असा मंत्र त्यांनी तात्या विंचूला या चित्रपटात दिला होता.

ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचं गुरुवारी निधन झालं. वयाच्या 83 व्या वर्षी पुण्यात दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र झपाटलेल्या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रत्येकाच्या मनात वेगळं घर करून आहे. 

तात्या विंचूला त्यांनी दिलेला मंत्र आजही चित्रपटाचं नाव घेतल्यानंतर अनेकांच्या ओठी येतो. झपाटलेला चित्रपट म्हटलं की तात्या विंचू आणि ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांनी साकारलेली भूमिका पटकन डोळ्यासमोर उभी राहाते. 

ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांनी रंगभूमिवरही काशीनाथ घाणेकर, शरद तळवळकर यांच्यासारख्या जेष्ठ अभिनेत्यांसोबत काम केलं होतं. त्यांच्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मोठा प्रभाव होता. 

झपाटलेला चित्रपटात राघवेंद्र कडकोळ यांनी बाबा चमत्कार ही व्यक्तिरेखा साकारली होती. 'झपाटलेला' या चित्रपटाच्या सिक्वेलमध्येही राघवेंद्र झळकले होते. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, दिलीप प्रभावळकर यांच्यासोबत असलेला हा चित्रपट अगदी घराघरा खूप गाजला होता.  ‘छोडो कल की बात’ या हिंदी चित्रपटात देखील त्यांनी काम केलं होतं.