मुंबई : थंडीने पुन्हा एकदा जोर धरला आहे... अशावेळी
आहारात कोणते पदार्थ ठेवावेत हे सुद्धा महत्वाचे आहेत. हिवाळ्यात वातावरणात गारवा असल्या कारणाने आहाराची अधिक काळजी घ्यायला लागते. काय खावं आणि काय खावू नये हे जाणून घेऊया.
1) डाळींब - हिवाळ्यात डाळिंब खाणं कायम फायदेशीर ठरू शकतं. शरिरातील बॅड कॉलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्याकरता डांळिंबाची मदत होते. इतर फळांच्या तुलनेत भरपूर अँटीऑक्सीडंट्स असतात. त्यामुळे याचा ज्यूस देखील अतिशय फायदेशीर आहे.
2) बदाम – उत्तम प्रकारचे स्निग्ध पदार्थ यातून मिळतात. रक्ताल्पता, हृदयाच्या विविध व्याधी, काही प्रकारचे कर्करोग, केसांच्या व त्वचेच्या विविध तक्रारी, कृशता, मधुमेह, स्थौल्य इत्यादी अनेक व्याधींमध्ये बदामाचा खूप चांगला उपयोग होतो. बदाम आदल्या रात्री भिजवून ठेवल्यास सकाळी त्याच्या साली सहज निघू शकतात. त्या साली पचनास कठीण असल्याने सालीशिवाय खाणे योग्य.
3) मनुके – यात तंतुमय पदार्थ जास्त असतात. रक्ताल्पता, मलबद्धता, शरीरातील अतिरिक्त उष्णता, हाडांचे विकार, स्थौल्य, डोळ्यांचे आजार इत्यादी अनेक व्याधींमध्ये याचा उपयोग होतो.
4) काजू – प्रथिने, चांगल्या प्रकारचे स्निग्ध पदार्थ यात असतात. हृदयविकार, बऱ्याच प्रकारचे कर्करोग, दातांचे, हाडांचे, विकार, रक्तवाहिन्यांचे विकार, स्थौल्य, मासिक पाळी बंद झाल्यानंतरच्या तक्रारी इत्यादी अनेक व्याधींमध्ये उपयोगी आहेत.
5) पिस्ता – यात चांगल्या प्रकारचे स्निग्ध पदार्थ, प्रथिने, तंतुमय पदार्थ असतात. डोळ्यांचे विकार, मधुमेह, हृदयविकार, मलबद्धता, कोलेस्टेरॉलच्या तक्रारी अनेक व्याधींमध्ये उपयोगी आहे.
6) अक्रोड – याला बुद्धीचे खाद्य म्हणून ओखळले जाते. ओमेगा-३ नावाचे चांगले स्निग्ध पदार्थ यात असतात. अस्थमा, संधीवात, सोरायसिस, निद्रानाश, मलबद्धता, कर्करोग, अल्झमायर इत्यादी विकारांमध्ये उपयोगी.
7) खजूर – तंतुमय पदार्थ, भरपूर प्रथिनेही यात असतात. मलबद्धता, आतडय़ांचे विकार, कृशता, हृद्रोग, रक्ताल्पता इत्यादींमध्ये उपयोगी. सर्व सुका मेवा चांगल्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात. म्हणजे ताणतणावामुळे शरीरात तयार होणाऱ्या विषारी द्रव्यांचा निचरा त्याच्यामुळे चांगला होतो.
8) ज्वारी-बाजरीच्या भाकरीबरोबर गूळ-तूप खाणे, जेवणात तिळाची चटणी, लसणाची चटणी, ओली हळद-आंबेहळद यांच्यापासून बनविलेले लोणचे यांचा समावेश असणे, तिळाची चिक्की खाणे.
9) सकाळी सुंठ-गूळ-तुपाची गोळी खाणे, रोज डिंकाचा लाडू, मेथीचा लाडू वा अळिवाचा लाडू खाणे, जेवणानंतर ओवा-तीळ-बाळंतशोपा वगैरे द्रव्यांपासून बनवलेली सुपारी खाणे, जेवणानंतर त्रयोदशगुणी विडा खाणे वगैरे साध्या उपायांनीही हिवाळ्यात उष्मांक मिळण्यास खूप चांगली मदत मिळते.
10) हिवाळ्यात प्यायचे पाणी गरम वा कोमट असणे उत्तम होय. जेवताना गरम पाणी पिण्याने अन्नपचन व्यवस्थित होण्यास मदत मिळते. तसेच एरवीसुद्धा गरम पाणी पिण्याने ऊब मिळण्यास मदत मिळते. - दूध, लोणी, ताक, तूप हे रोजच्या खाण्यात असावेत, असे पदार्थ हिवाळ्यातही खाण्यास उत्तम असतात. हिवाळ्यात ऊब मिळावी म्हणून दुधात सुंठ, केशर वगैरे घालता येते. लोण्यामध्ये काळी मिरी, आले, थोडासा लसूण, कोथिंबीर घातली तर ते अतिशय रुचकर लागते आणि शरीराला स्निग्धता व ऊब दोन्ही देऊ शकते.