ऐकलंत का...आता कोरोनाला रोखण्यासाठी 6 फुटांचं अंतरही अपुरं

कोरोना प्रतिबंधासाठी सहा फूट अंतर पुरेसं नसल्याचं एका अभ्यासातून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Updated: Sep 16, 2021, 10:42 AM IST
ऐकलंत का...आता कोरोनाला रोखण्यासाठी 6 फुटांचं अंतरही अपुरं title=

मुंबई : कोरोना प्रतिबंधासाठी सहा फूट अंतर पुरेसं नसल्याचं एका अभ्यासातून स्पष्ट करण्यात आलं आहे. कोरोना हवेतील कणातून पसरतो. त्यामुळे बंदिस्त खोल्यांमध्ये तो जास्त पसरला जाऊ शकतो, असं एका अभ्यासात दिसून आलं आहे. शारीरिक किंवा सामाजिक अंतर हे करोनाला प्रतिबंध करण्यासाठी पुरेसा घटक नाही, असं ‘सस्टेनेबल सिटीज अँड सोसायटीज’ या नियतकालिकात म्हटलं आहे.

सोशल डिस्टंसिंग आणि मास्कचा वापर हाच कोरोनापासून वाचण्याचा उपयुक्त मार्ग असल्याचं आपण गेल्या दीड वर्षापासून म्हणतोय. यावेळी आपण सोशल डिस्टंसिंगमध्ये 6 फूटांचं अंतर ठेवण्यात येतंय. मात्र आता नुकत्याच समोर आलेल्या एका अभ्यासानुसार, 2 मीटर म्हणजेच 6 फूटांचं अंतर आता कोरोनाचं संक्रमण दूर ठेवण्यासाठी पुरेसं नसल्याचं समोर आलेलं आहे. 

या नव्या अभ्यासानुसार, हे अंतर घरामध्ये व्हायरस वाहून नेणाऱ्या एयरबोर्न एरोसॉल्सच्या प्रसारणास प्रतिबंध करण्यासाठी पुरेसं नाही. सस्टेनेबल सिटीज अँड सोसायटी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासाचे निष्कर्ष असं सुचवतात की, श्वासोच्छ्वासातून बाहेर पडणाऱ्या एरोसोलच्या मानवी संपर्कात येण्यापासून रोखण्यासाठी केवळ शारीरिक अंतर पुरेसं नाही. त्यामुळे मास्किंग आणि हवा खेळती राहील, अशी व्यवस्था असणं गरजेचं आहे.

या संशोधनासाठी संशोधकांनी एका जागेवर किती प्रमाणात हवा खेळती राहते याचा दर, विविध वायुवीजन धोरणांशी संबंधित इनडोअर एअरफ्लो पॅटर्न आणि बोलताना तसंच श्वास घेताना किती प्रमाणात ऐरोसोल बाहेर पडतात आणि त्याचं प्रमाण, या सर्व घटकांची तपासणी केली. 

एअर-टाइट सिस्टीममध्ये गळती तपासण्यासाठी आणि मानवी श्वसन एरोसॉल्सचे आकारमान 1 ते 10 मायक्रोमीटरपर्यंत असतात. या श्रेणीतील एरोसोल SARS-CoV-2 वाहून नेऊ शकतात. हा विषाणू कोरोना होण्यास कारणीभूत आहे.

अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीचे लेखक आणि अभ्यासक जेन पे म्हणाले, की “आम्ही कोरोनाची लागण झालेल्या लोकांकडून इमारतींमध्ये सोडलेल्या व्हायरसयुक्त कणांच्या हवेतील प्रसाराचा शोध घेणार आहोत. व्हायरसच्या इनडोअर एक्सपोजरसाठी नियंत्रण धोरण म्हणून वेंटिलेशन आणि शारीरिक अंतराच्या परिणामांची तपासणी केली.”

या अभ्यासातून असंही दिसून आलं की, संक्रमित व्यक्ती जर मास्कविना बोलत असेल तर त्याच्या बोलण्यातून विषाणूंनी भरलेले कण 2 मीटरच्या क्षेत्रात अवघ्या एका मिनिटात प्रसारित होतात. तर ज्या ठिकाणी हवा पुरेशी खेळती राहत नाही, त्याठिकाणी हे प्रमाण जास्त आढळतं असल्याचंही समोर आलंय आहे.