मुंबई : केंद्रीय कर्मचारी दीर्घकाळ महागाई भत्त्यात वाढ होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. जुलैपासून हे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अशातच नवोदय विद्यालय शाळेत (एनव्हीएस) कार्यरत असलेल्या केंद्र सरकारच्या कर्मचार्यांसाठी एक चांगली बातमी आहे. या कर्मचाऱ्यांना आता डीए व्यतिरिक्त मेडिकल क्लेम देखील वाढवून मिळणार आहे. शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, एनव्हीएस मुख्याध्यापकांच्या मेडिक्लेमची मर्यादा 5000 रुपयांवरून 25,000 रुपये करण्यात आली आहे.
परिपत्रकानुसार केंद्र सरकारने एनव्हीएसच्या प्राचार्यांसाठी वार्षिक वैद्यकीय प्रतिपूर्ती हक्क मर्यादेमध्ये सुधारणा केली आहे. सरकारी किंवा सीजीएचएस मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचार केल्यास एनबीएसच्या मुख्याध्यापकांसाठी सध्याची मर्यादा 5000 हून 25,000 करण्यात आली आहे.
हा मेडिकल क्लेम कर्मचारी स्वत:साठी किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांसाठी घेऊ शकतो. त्यांचे नाव सीजीएस कार्डमध्ये नमूद असलं पाहिजे. इतर अटी तशाच राहणार आहेत. नवोदय विद्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे. येत्या 1 जुलैपासून हे अंमलात येणार आहे.
डीएच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचार्यांना लवकरच चांगली बातमी मिळू शकते. मीडिया अहवालांनुसार, यंदा 26 जून 2021 रोजी जेसीएमची नॅशनल काऊंसिल कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग अर्थ मंत्रालयाच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेईल. केंद्र सरकारने 1 जुलै 2021 पासून आपल्या कर्मचार्यांना महागाई भत्ता (डीए) परत देण्याची घोषणा केली होती. कर्मचार्यांच्या बाजूने घेतलेला हा निर्णय सुमारे 52 लाख कर्मचारी आणि 60 लाख केंद्रीय निवृत्ती वेतनधारकांना फायदेशीर ठरेल.