दिल्ली : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगभरात हाहाकार माजवलाय. अनेक देशांमध्ये कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट पसरला आहे. तर आता व्हायरसच्या आणखी एका व्हेरिएंटचा धोका निर्माण झाला आहे. या व्हेरिएंटला BA-2 असं नाव देण्यात आलं आहे. चिंतेची बाब म्हणजे टेस्टिंग कीटमध्ये हा व्हेरिएंट ओळखला जात नाही. म्हणूनच याला 'स्टेल्थ' म्हणजेच हिडन व्हर्जन म्हटलं जातंय.
आतापर्यंत, या व्हेरिएंटची प्रकरणं यूके, ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्कमध्ये नोंदवली गेलीयेत. हा व्हेरिएंट ओमायक्रॉन सारखा वेगाने पसरत असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत या व्हेरिएंटची लागण झाल्याचं समजत नसल्याने संसर्ग रोखणं हे मोठं आव्हान आहे.
या व्हेरिएंटचं पहिलं कुठे आढळलंय याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. ब्रिटीश हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीच्या म्हणण्यानुसार, 6 डिसेंबर 2021 रोजी यूकेमध्ये या व्हेरिएंटची नोंद करण्यात आली. हा व्हेरिएंट इतर व्हेरिएंटपेक्षा वेगाने पसरतो. त्यामुळे यूकेमध्ये याला अंडर इन्व्हेस्टिगेशन श्रेणीमध्ये ठेवण्यात आलं आहे.
कोरोनाच्या BA-2 या नव्या व्हेरिएंटची लक्षणं ओमायक्रॉन व्हेरिएंटप्रमाणेच आहेत. कोरोनाचे नवा व्हेरिएंटचं निदान होण्यासाठी 'ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन शेअरिंग ऑल इन्फ्लुएंझा' अंतर्गत सर्व देशांकडून डेटा गोळा केला जातोय. आतापर्यंत भारतासह जवळपास 40 देशांनी त्यांचा डेटा पाठवला आहे.
आतापर्यंत, BA-2 या नवीन व्हेरिएंटच्या संसर्गाची भारतात खात्री करण्यात आलेली नाही. मात्र भारतातून 530 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. ब्रिटन, स्वीडन आणि सिंगापूर या प्रत्येक देशाने 100 हून अधिक नमुने चाचणीसाठी पाठवले आहेत.