Omicron च्या संसर्गापासून वाचण्यासाठी उपाय सापडला; NIV च्या अभ्यासातून मोठी बाब समोर

पुण्याच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) या संस्थेने केलेल्या अभ्यासातून ही महत्त्वाची बाब समोर आली आहे.

Updated: Apr 3, 2022, 01:46 PM IST
Omicron च्या संसर्गापासून वाचण्यासाठी उपाय सापडला; NIV च्या अभ्यासातून मोठी बाब समोर title=

मुंबई : कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने दहशत पसरवली होती. दरम्यान या व्हेरिएंटसंदर्भात ज्या व्यक्तींनी कोविशील्ड, कोवॅक्सीन लस घेतली आहे अशा लोकांमध्ये सहा महिन्यांनंतर अँटीबॉडीची पातळी कमी होऊ लागत असल्याचं दिसून आलंय. 

पुण्याच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) या संस्थेने केलेल्या अभ्यासातून ही महत्त्वाची बाब समोर आली आहे. एनआयव्हीच्या शास्त्रज्ञ डॉ. प्रज्ञा यादव यांनी सांगितलं की, डेल्टा आणि इतर व्हेरिएंटमध्ये पहिल्या डोसमध्ये कोविशील्ड आणि दुसऱ्या डोसमध्ये कोवॅक्सीन दिल्याने चांगले परिणाम दिसून येतात.

या अभ्यासाचे निष्कर्ष जर्नल ऑफ ट्रॅव्हल मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. अभ्यासाअंतर्गत लसीच्या परिणामांचे 3 श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली. चाचणी अंतर्गत असलेल्या सर्व लोकांचे बारकाईने निरीक्षण करण्यात आलं. यावेळी अभ्यासात असं दिसून आलं की, ओमायक्रॉनच्या बाबतीत, लसीकरणानंतरची प्रतिकारशक्ती सहा महिन्यांनंतर कमकुवत होऊ लागली. यामुळे लसीकरण धोरणात बदल करण्याची शक्यता असल्याचं दिसून येतंय.

डॉ प्रज्ञा यादव म्हणाल्या, "या अभ्यासाठी 3 गट तयार करण्यात आले असून तिन्ही गटांचे बारकाईने निरीक्षण करण्यात आलं. यावेळी असं आढळून आलं की, ज्यांना Covashield चा पहिला डोस आणि Covaxin चा दुसरा डोस मिळाला त्यांच्यामध्ये डेल्टा आणि इतर प्रकारांविरुद्ध खूप चांगल्या अंटीबॉडीज होत्या.

तर ज्यांना एकच लस दोन डोसमध्ये मिळाली होती त्याच्यांमध्ये अँटीबॉडीज कमी दिसून आल्या. तसंच ओमायक्रॉनपासून रिकवर होण्यासाठी बूस्टर डोसची गरज असल्याचं अभ्यासातून दिसून आलंय, असंही डॉ. यादव यांनी सांगितलं.