Mumbai News : रणरणतं उन्ह... तळपत्या उन्हाचा सहन न होणारा दाह...आणि दुपारच्या वेळी कामानिमित्त बाहेर पडलेला चाकरमानी... साहजिकच रस्त्याच्या कडेला लाल फडक्यात गुंडाळलेल्या माठातील गारेगार पेयांकडे आकर्षित होतोच होतो. घश्याला पडलेली कोरड शीतपेय पिण्यास माणसाला उद्युक्त करते. मात्र हीच शीतपेयं तुमच्या आरोग्याला अपायकारक ठरु शकता. नफा कमावण्यासाठी काही विक्रेते भेसळयुक्त शीतपेय ग्राहकांना देत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. अन्न आणि औषध प्रशासनाने असेच काही नमुने या विक्रेत्यांकडून ताब्यात घेतले आहेत. आरोग्यास अपायकारक पदार्थ आढळल्यास थेट कारवाईचा इशारा प्रशासनाने दिलाय.
रस्त्याच्या कडेला शीतपेयांची सर्रास विक्री सुरू आहे. त्यात गारेगार लस्सी,बर्फ घातलेलं ताक, फळांचे रस अशा पद्धतीच्या शीतपेयांची विक्री जोमात आहे. यात भेसळ आढळल्यास कारवाई केलीच पाहिजे अशी भूमिका विक्रेत्यांनीही घेतलीये. तर या कारवाईचं ग्राहकांनाही स्वागत केलंय. कधी सोबतच्या लहानग्यानं हट्ट केला म्हणून तर कधी आपणंच तहान लागली म्हणून रस्त्याच्या कडेला असेलल्या शीतपेयांचा आधार घेत तहान भागवतो. मात्र उन्हाळ्यात याच शीतपेयांचा एक ग्लास तुम्हाला थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास पुरेसा ठरु शकतो. त्यामुळे सोबत पाण्याची बाटली बाळगा किंवा स्वच्छ जागीच शीतपेयांचा आनंद घ्या.
उन्हाळ्यात कोणती काळजी घ्याल?
दूध, लस्सी किंवा ताक सारख्या दुग्धजन्य पदार्थांचा देखील या कालावधीत मोठ्या प्रमाणावर पिण्यासाठी वापर केला जातो. लिंबू पाणी प्यायल्याने तुम्हाला हायड्रेटेड राहण्यास मदत होते, ज्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. तहान शमवण्यासाठी आणि उष्णतेच्या दिवसात थंडावा देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
दरम्यान, उन्हाळ्यात थंड दूध पिणे जास्त फायदेशीर आहे. हे पिल्याने शरीरातील उष्णता संपून शरीर आतून थंड होते. दूध नेचरमध्ये थंडगार असल्याने ते प्यायल्याने शरीर थंड राहते. पोटात जळजळ, अॅसिडिटी आणि अल्सरचा त्रास होत असेल तर थंड दूध हा उत्तम उपाय आहे. उन्हाळ्यात दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान थेट उन्हात जाणं टाळा. घराबाहेर असाल किंवा शारीरिक हालचाल जास्त करत असल्यास पाणी पीत राहा, त्याने शरिरात जास्त पाणी राहिल. तिखट आणि तळलेले पदार्थ खाणे टाळा.