नशेत असताना पुरूष महिलांकडे कसे पाहतात?: रिसर्च

अनेकदा पुरूषांचे महिलांकडे पाहणे हे तो नशेत आहे किंवा नाही यावर अवलंबून असते.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 25, 2017, 02:29 PM IST
नशेत असताना पुरूष महिलांकडे कसे पाहतात?: रिसर्च title=

वॉशिंग्टन : अनेक पुरूषांना महिलांकडे पाहण्याची सवय असते. त्यामागे ज्याचे त्याचे विविध विचार असतात. पण, खास करून नशेच्या अंमलाखाली असलेले पुरूष महिलांकडे कशा नजरेने पाहतात, याबाबत नुकताच एक सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेतील निष्कर्ष असा की, अशा वेळी पुरूष हे महिलांकडे केवळ एक वस्तू म्हणूच पाहतात.

अमेरिकेतील नेब्रास्का-लिंकोइन विद्यापिठातील अभ्यासकांनी हा सर्व्हे केला. पुरूषांवर असलेला नशेचा अंमल आणि त्या काळात महिलांकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोण यांवर हा सर्व्हे आधारलेला होता. या सर्व्हेतून पुढे आलेल्या निष्कर्षात असे म्हटले आहे की, नशेचा अंमल असताना पुरूष महिलांकडे एखाद्या वस्तूप्रमाणे पाहतात. खास करून असे त्या महिलांसोबत घडते ज्यांना ते पुरूष आकर्षक किंवा मित्र मानत नाहीत. 

या सर्व्हेतील निष्कर्ष सेक्स रोल्स जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. या जर्नलमध्ये म्हटले आहे की, या अभ्यासासाठी 20 ते 30 वर्षांपर्यंतच्या साधारण 50 पुरूषांना सहभागी करून घेता आले. अभ्यासकांनी या पैकी 29 पुरूषांना मद्य सेवन करण्यास दिले. तर, इतरांना साधारण पेय पिण्यास दिले. या सर्वांना जवळपास 80 महिला आणि तरूणींची छायाचित्रे दाखवण्यात आली. या महिलांच्या व्यक्तिमत्वाबाबत या 50 पुरूषांना विचारण्यात आले. आय ट्रेकरच्या माध्यमातून हेही पाहण्यात आले की, महिलांची चित्रे पाहात असताना पुरूष त्यांच्या शरीराच्या कोणत्या भागाकडे पाहतात.

दरम्यान, या अभ्यासात एक बाब समोर आली की, अनेकदा पुरूषांचे महिलांकडे पाहणे हे तो नशेत आहे किंवा नाही यावर अवलंबून असते. तसेच, तो महिलेकडे व्यक्ती किंवा वस्तू म्हणून पाहताना तो नशेत आहे किंवा नाही हा घटकही प्रचंड महत्त्वाचा ठरतो.