वॉशिंग्टन : अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (AAP) आणि चिल्ड्रन्स हॉस्पिटल असोसिएशनच्या ताज्या अहवालानुसार, जगातील सर्वात मोठी आणि आघाडीची आरोग्य सेवा प्रदाता असलेल्या अमेरिकेत सध्या 14.5 दशलक्षाहून अधिक मुलांना कोविड-19 ची लागण झाली आहे. यापैकी, गेल्या चार आठवड्यात 343,000 हून अधिक प्रकरणं नोंदवली गेली असल्याची माहिती आहे.
गेल्या ऑगस्ट महिन्यात देशातील सुमारे 90,600 मुलांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर सावधगिरीचा इशारा जारी करून, यूएस डिपार्टमेंट ऑफ हेल्थ-संलग्न AAP ने सांगितलं की, रोगाची तीव्रता तसंच नवीन प्रकारांशी संबंधित संभाव्य लॉन्ग टर्म प्रभावांचं मूल्यांकन करण्यासाठी विशिष्ट डेटा गोळा करणं आवश्यक आहे.
AAP ने म्हटलंय की, "साथीच्या रोगाचा मुलांच्या आरोग्यावर तात्काळ परिणाम होतो हे ओळखणं महत्त्वाचं आहे. मुलं आणि तरुणांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणावर दीर्घकाळ टिकणारे परिणाम ओळखून त्यांचं निराकरण करणं आवश्यक आहे." '
अमेरिकेच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, देशात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण कार्यक्रम सुरू असतानाही मुलांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना असणं ही चिंतेची बाब आहे. सर्व मुलांची योग्य काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सध्या काळजी करण्यासारखं कारण नाही.
संशोधनानुसार, शास्त्रज्ञांना अमेरिकेत कोरोनाचे ओमिक्रॉनचे नवीन प्रकार सापडले आहेत. गेल्या आठवड्यात BA.4.6 च्या नवीन प्रकारामुळे अमेरिकेत 8 टक्के नवीन केसेस आल्याचा दावा केला जातोय. दरम्यान चांगल्या प्रतिकारशक्तीमुळे लोक त्यावर मात करू शकतात. येत्या काही दिवसांत नवीन रुग्णांची संख्या वाढू शकते, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.