जीरे : तजेलदार चेहऱ्यासाठी असा करा वापर

असा करा जिऱ्याचा वापर...

Updated: Jun 28, 2020, 03:10 PM IST
जीरे : तजेलदार चेहऱ्यासाठी असा करा वापर
संग्रहित फोटो

मुंबई : भारतीय जेवणात जीरं हा मसाल्याचा महत्त्वाचा पदार्थ असून त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. जीरं जेवणाचा स्वाद वाढवण्यासह गुणकारीही आहे. खाण्यासह जिऱ्याचा वापर चेहऱ्यासाठीही केला जाऊ शकतो. जिऱ्यामध्ये एन्टी-इंफ्लेमेटरी आणि एन्टीऑक्सिडेंट गुण आढळतात. जे आरोग्यासह तजेलदार, चमकदार त्वचेसाठी फायदेशीर ठरु शकतं. चेहऱ्यावरील मुरमं कमी करण्यासही जीरं गुणकारी ठरु शकत. जिऱ्याचं सेवन रक्तदाब, पचनशक्ती उत्तम राखण्यासही उपयोगी ठरतं.

जिऱ्यात बरेच एन्टीऑक्सिडेंट असल्याने सुरकुत्या, काळी वर्तुळे आणि त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते. जीरं रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यास आणि सकाळी उठल्यावर या पाण्याने चेहरा धुतल्यास फायदा होऊ शकतो. 

जिऱ्याच्या पाण्याने वाफही घेऊ शकता. यामुळे चेहऱ्यावरील बॅक्टेरिया, इतर अशुद्ध घटकही बाहेर निघण्यास मदत होऊ शकते. यामुळे ब्लॅकहेड्स काढणंही सोपं होऊ शकतं. वाफ घेतल्याने त्वचेमधील रक्तप्रवाह सुरळित होण्यास मदत होते.

जिऱ्यापासून बनलेला फेसपॅकही फायदेशीर ठरु शकतो. फेसपॅक बनवताना थोडी हळद आणि जीरं हे मिश्रण करुन त्यात मधाचे काही थेंब टाकावेत. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावावा, काही वेळाने सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे चेहरा तजेलदार होण्यास मदत होऊ शकते.