मुंबई : लसीकरणासंदर्भात देशातील नागरिकांचं एक सर्व्हेक्षण करण्यात आलं आहे. लसीकरणानंतर लोकांच्या अनुभवाबाबत हे सर्वेक्षण करण्यात आलं. कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर त्यांना काय दुष्परिणाम जाणवले का, किंवा लस घेतल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली का याबाबत प्रश्न विचारण्यात आले.
या सर्व्हेक्षणातून असं समोर आलं की, 70% भारतीय ज्यांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला त्यांना लस घेतल्यानंतर 24-48 तासांच्या आत सौम्य दुष्परिणाम दिसून आली. मात्र, एक टक्के लोकांनी कोविशील्ड घेतल्यानंतर त्यांना कोरोना झाल्याचं सांगितले. त्याच वेळी, 44 टक्के लोकांनी सांगितले की त्यांना कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम जाणवले नाहीत.
यामध्ये 13 टक्के लोकांनी त्यांना हाताचं दुखणं असल्याचं सांगितलं. 6 टक्के लोकांच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांना अशक्तपणा जाणवला. 9 टक्के लोकांच्या सांगण्यानुसार, त्यांना ताप आला होता.
दुसरीकडे, कोविशील्डच्या दुसऱ्या डोसबद्दल बोलताना, 75 टक्के लोकांना अतिशय सौम्य लक्षणं दिसली. 4 टक्के लोकांनी सांगितलं की, लस घेतल्यानंतर त्यांना संसर्ग झाला. 56 टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार, त्यांना कोणताही दुष्परिणाम जाणवला नाही. दुसरीकडे, 9 टक्के लोकांनी हात दुखणं, 5 टक्के अशक्तपणा आणि 7 टक्के तापाची नोंद केली.
Covaxin बद्दल बोलायचं झालं तर, पहिला डोस घेतलेल्या 64 टक्के लोकांना अत्यंत सौम्य लक्षणं दिसली. त्याच वेळी, एक टक्के लोकांना काही गंभीर समस्या जाणवल्या. 36 टक्के लोकांनी सांगितलं की, त्यांना कोणतीही लक्षणं दिसली नाहीत. 15 टक्के लोकांना हात दुखणं, 5 टक्के अशक्तपणा आणि 18 टक्के तापाची तक्रार नोंदवली.
Covaxinचा दुसरा डोस घेणाऱ्या 78 टक्के लोकांना लस घेतल्यानंतर 24 ते 48 तासांच्या आत अत्यंत सौम्य लक्षणं दिसली. 3 टक्के लोकांनी गंभीर समस्यांची तक्रार केली, तर 2 टक्के लोकांनी कोविडची लक्षणं दिसून आली. 52 टक्के लोकांमध्ये कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत.