बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मस्साजोगच्या गावकऱ्यांनी एल्गार पुकारलाय. गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करत आरोपींच्या अटकेची मागणी केलीय. या आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. 10 दिवसांत आरोपींना अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मस्साजोगच्या गावकऱ्यांनी दिलाय. यावेळी मस्साजोगमधील महिलांनी तपासातील दिरंगाईबद्दल देखील तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मस्साजोगच्या गावकऱ्यांच्या जलसमाधी आंदोलना दरम्यान आंदोलक प्रभावती सोळंके यांना चक्कर आली होती. प्रभावती या जवळपास तासभर पाण्यात उभारून आंदोलन करत होत्या. प्रभावती यांना उपचारासाठी रुग्णलयात दाखल करण्यात आलंय. चक्कर आल्यानंतर आंदोलक गावकऱ्यांनीच प्रभावती यांना पाण्याबाहेर काढलं. यावेळी पोलीस आणि महसूल प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं.
मस्साजोगचे गावकरी आक्रमक
दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी हे जलसमाधी आंदोलन मागे घेतलं. मस्साजोगच्या गावकऱ्यांशी चर्चा करून आरोपींना दहा दिवसात अटक करू, असं आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गावकऱ्यांना दिलं आहे.
बीड पोलीस आणि सीआयडी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या मागावर आहेत. फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यामुळे लवकरात लवकर या आरोपींच्या मुसक्या आवळ्यात याव्यात यासाठी मस्साजोगचे गावकरी आक्रमक झाले आहेत.
राज्य सरकारकडून एसआयटी समितीची स्थापना
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने एसआयटी समितीची स्थापना केली आहे. या समितीत 9 पोलीस अधिकारी असणार आहेत. आयपीएस बसवराज तेली यांच्या नेतृत्वात या एसआयटी समितीची स्थापना करण्यात आली आहे. बसवराज तेली सीआयडीमधील आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख आहेत. एसआयटीमध्ये सर्वच अधिकारी बीड जिल्ह्यातील आहेत. सध्याचे तपास अधिकारी डीवायएसपी अनिल गुजर हेही तपास पथकात असणार आहेत.