दौरे आणि मुहूर्तामुळं की नाराजी? महायुतीच्या मंत्र्यांना खात्याचा पदभार स्वीकारायला का लागतोय वेळ?

Mahayuti Ministers: मंत्रिमंडळ विस्ताराला महिना होत आला तरी अजूनही काही मंत्र्यांनी आपापल्या खात्यांचा पदभार स्वीकारलेला नाही. 

Pravin Dabholkar | Updated: Jan 1, 2025, 08:47 PM IST
दौरे आणि मुहूर्तामुळं की नाराजी? महायुतीच्या मंत्र्यांना खात्याचा पदभार स्वीकारायला का लागतोय वेळ? title=
महायुती खातेवाटप

Mahayuti Ministers: महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाला उशीर झाला. आता मिळालेल्या खात्यांची सूत्रं स्वीकारण्यासाठी मंत्री उशीर लावतायेत. खातेवाटप झाल्यानंतरही अनेक मंत्र्यांनी आपापल्या खात्यांची सूत्रं स्वीकारलेली नाहीत. खात्यांचा पदभार स्वीकारला नसल्यानं मंत्र्यांची कामं सुरु झालेली नाहीत. खात्यांचा पदभार स्वीकारण्यावरुन आता मंत्र्यांची सारवासावर सुरु झालीये.महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 5 डिसेंबरला झाला. त्यानंतर 21 डिसेंबरला खातेवाटप जाहीर झालं. मंत्रिमंडळ विस्ताराला महिना होत आला तरी अजूनही काही मंत्र्यांनी आपापल्या खात्यांचा पदभार स्वीकारलेला नाही. पदभार स्वीकरला नसल्यानं अजूनही अनेक खात्यांना नावापुरतेच मंत्री असल्याचं स्थिती आहे. पदभारावरुन आता सारवासारव करण्याची वेळ मंत्र्यांवर आलीय.

क्रीडामंत्री दत्ता भरणे तर मंत्रिपदाचा पदभार स्वीकारण्याऐवजी परदेश दौऱ्यावर गेले होते. क्रीडा खातं मिळाल्यानं नाराज असल्याचं ते सांगण्यात येतं होतं. दत्ता भरणेंनीही लवकरच पदभार स्वीकारणार असल्याचं जाहीर केलंय. खात्याबाबत नाराज नसल्याचंही ते सांगण्यास विसरले नाहीत. काही मंत्री पदभार स्वीकारण्यासाठी चांगला दिवस शोधतायेत. त्यामुळं कदाचित वेळ लागल्याचा दावा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी केलाय.काही मंत्र्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यानं पदभार स्वीकारण्यास वेळ लागल्याचं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलंय. मंत्री झाल्यानंतर प्रत्येक मंत्र्यांला पदभार स्वीकारण्याची घाई असते. महायुतीच्या मंत्र्यांमध्ये खात्यांचा पदभार स्वीकारण्यात निवांतपणा का आलाय?. याला नाराजीची किनार आहे का? ही चर्चा आता जोर धरु लागलीये.

आधी खातेवाटपावरुन आता बंगलेवाटपावरुन मंत्री नाराज?

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. खातेवाटपानंतर जास्त विलंब न लावता दोन दिवसांत मंत्रालयातील दालन आणि बंगले वाटप करण्यात आले आहेत. बंगले व दालन वाटपावरून महायुतीत नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विश्वासात न घेता दालन, बंगले वाटप करण्यात आल्याने काही मंत्री नाराज आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुती सरकारमधील सर्व मंत्र्यांना बंगल्याचं वाटप करण्यात आलं आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तार ,खातेवाटप  वाद मिटल्यानंतर आता बंगले व दालन वाटपावरून महायुतीत नाराजी असल्याचे सूत्रांनी दिली आहे. काही मंत्री यांना बंगले न मिळाल्याने नाराज आहेत, तर काही मंत्री वास्तू प्रमाणे दालन मिळाली नाही म्हणून नाराज असल्याचे समोर आले आहे. काही बंगले अनलकी आहेत त्या बंगल्यात जाण्यास काही मंत्री तयार नाहीत. ही नाराजी जेष्ठ नेत्याकडे बोलून दाखवली असल्यामुळं येणाऱ्या काळात बंगले व दालन अदलाबदल होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विश्वासात न घेता दालन, बंगले वाटप करण्यात आल्याने काही मंत्री नाराज आहेत. अनेक मंत्री वास्तुशास्त्राप्रमाणे दिशा बघून दालन व बंगले घेत असतात. पण वाटपाचे थेट आदेश आल्याने मंत्री गडबडून गेले. मंत्रालयात सर्व मंत्र्यांना सामावून घेण्याएवढी दालने उपलब्ध नसल्याने तीन राज्यमंत्र्यांची कार्यालये विधान भवनात थाटण्यात आली आहेत. 

कोणत्या नेत्यांना कोणता बंगला?

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला देण्यात आला आहे. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पर्णकुटी बंगला देण्यात आला आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे महसूल मंत्री आहेत. तर पंकजा मुंडे या पर्यावरण मंत्री आहेत. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना ज्ञानेश्वरी बंगला देण्यात आला आहे. तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवगिरी बंगल्याचं वाटप करण्यात आलं आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयलस्टोन बंगला देण्यात आला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांना (क-८) विशाळगड बंगला देण्यात आला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांना ब-१ सिंहगड देण्यात आला आहे.