Corona Update : भारतात कोरोना (Corona) रुग्ण संख्या आटोक्यात येत असतानाच आता पुन्हा चिंता वाढली आहे. कोरोनानं पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. ओमायक्रॉनचा (Omicron) नवा सब-व्हेरियंट (Sub Variant) सापडल्याने पुन्हा नवं संकट उभं राहिलं आहे.
कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या BA.4 सब-व्हेरिएंटने भारतात शिरकाव केला आहे. त्या पाठोपाठ आता BA.5 चंही एक प्रकरण समोर आलं आहे.
जीनोम सिक्वेन्सिंगसाठी आरोग्य मंत्रालयाने प्रमाणित केलेल्या INSACOG ने याला दुजोरा दिला आहे. तामिळनाडूमधील एका 19 वर्षीय मुलीला कोरोनाच्या BA.4 प्रकाराची लागण झाली आहे. रुग्णामध्ये सौम्य लक्षणे आढळून आली असून तिचं संपूर्ण लसीकरण झालं होतं. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या हैदराबादमधील एका व्यक्तीलाही याच प्रकाराची लागण झाल्याचं आढळून आलं होतं.
इंसाकॉगने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या BA.5 प्रकाराचं देखील एक प्रकरण समोर आलं आहे. तेलंगणात हा रुग्ण आढळला आहे. BA.5 ची लागण झालेल्या रुग्णामध्येही सौम्य लक्षणे आढळून आली आहेत आणि त्यालाही लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. रुग्णाचा प्रवासाचा इतिहास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून संपर्क ट्रेसिंग सुरू करण्यात आलं आहे.
ओमायक्रॉनचा BA.4 आणि BA.5 सब व्हेरिएंट जगभरात कोरोनाची प्रकरणं वाढण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. 16 देशांत BA.4 चे जवळपास 700 रुग्ण तर 17 देशात BA.5च्या 300 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाचे हे सब व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य असले तरी घातक नाहीत असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.