कोरोनामुळे 15 वर्षांच्या मुलीने आवाज गमावला, आता चवीसह आवाजही हिरावून घेतोय नवा व्हेरिएंट!

Corona Side Effects : कोरोनामुळे आता फक्त चव किंवा गंधच नाही तर आवाजही जाऊ शकते. समोर आले धक्कादायक प्रकरण   

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 26, 2023, 04:25 PM IST
कोरोनामुळे 15 वर्षांच्या मुलीने आवाज गमावला, आता चवीसह आवाजही हिरावून घेतोय नवा व्हेरिएंट! title=

कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत अनेक गंभीर आरोग्य समस्या समोर आल्या आहेत. पूर्वीच्या अभ्यासात, संसर्गानंतर लाँग कोविडच्या समस्यांमुळे शास्त्रज्ञांची चिंता वाढली होती. जागतिक स्तरावर पुन्हा एकदा कोरोनाचा धोका झपाट्याने वाढताना दिसत आहे. ओमिक्रॉनच्या नवीन सब-व्हेरियंट JN.1 चा धोका वाढताना दिसत आहे. 15 वर्षांच्या मुलीचा आवाज कोरोनाची लागण झाल्यामुळे गेला आहे. 

तरुणीला 13 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिला कोरोनाची लागण झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. यानंतर तरुणीला श्वास घेण्यास त्रास होत होता. यानंतर हळू हळू तिचा आवाज गेला. एंडोस्कोपिमध्ये असे दिसून आले की, तिला बायटरल व्होकल पॅरालिसीस झाला आहे. पीडियाट्रिक्स वृत्तामध्ये हा रिसर्च प्रकाशित करण्यात आला आहे. तसेच द हिंदूने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केले आहे. लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार अधिक प्रमाणात होताना दिसून येतं आहे. यामध्ये मुलांना दम्याची लक्षणे सर्वात आधी दिसून येत आहेत. यामध्ये कोरोनाचे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सध्या या मुलीवर उपचारांसाठी सुरुवातीला स्पीच थेरपीची मदत घेण्यात आली. मात्र तरीही तिचा आवाज परत आला नाही. यानंतर तिच्या शस्त्रक्रिया करुन श्वसननलिकेत छिद्र करण्यात आले, ज्यामुळे तिला पुन्हा आधीसारखा श्वास घेता येऊ लागला आहे. ही घटना अमेरिकेत घडली आहे. 

अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स नेत्र आणि कान रुग्णालयातील संशोधकांनी असा निष्कर्ष काढला आहे की कोरोना संसर्गामुळे मज्जासंस्थेशी संबंधित किंवा न्यूरोपॅथिक गुंतागुंत देखील होऊ शकते, परिणामी व्होकल कॉर्डचा पक्षाघात होऊ शकतो. पेडियाट्रिक्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यास अहवालात शास्त्रज्ञांनी कोरोनामुळे होणाऱ्या या गंभीर समस्येबाबत सावधगिरी बाळगली आहे. 

अभ्यासाच्या लेखकांचे म्हणणे आहे की, कोविड-19 सुरू झाल्यापासून किशोरवयीन मुलांमध्ये व्होकल कॉर्ड पॅरालिसिसची ही पहिलीच घटना आहे, जरी प्रौढांमध्ये ही स्थिती यापूर्वी नोंदवली गेली आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूलचे प्राध्यापक क्रिस्टोफर हार्टनिक म्हणतात की, व्हायरसचा संसर्ग डोकेदुखी, फेफरे आणि परिधीय न्यूरोपॅथीसह विविध न्यूरोलॉजिकल गुंतागुंतांशी संबंधित आहे. हे प्रकरण सूचित करते की व्होकल कॉर्ड पॅरालिसिस ही कोरोनाव्हायरसची अतिरिक्त न्यूरोपॅथिक गुंतागुंत असू शकते.

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)