नखांवरील अशी खूण असू शकते कोरोनाचं लक्षण

एका नव्या संशोधनानुसार, कोविड रूग्णांच्या नखांवर एक निशाणी येऊ शकते.

Updated: Jun 9, 2021, 09:09 PM IST
नखांवरील अशी खूण असू शकते कोरोनाचं लक्षण title=

जगभरातील अनेक संशोधक कोरोनाच्या विविध मुद्द्यांवर संशोधन करत आहेत. या संशोधनांमधून अनेकदा चकीत करणारी माहिती समोर येते. तर नुकतंच एका संशोधनातून कोरोनाच्या लक्षणाबाबतची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास तसंच वास आणि चव येण्याची क्षमता कमी होणं या लक्षणांबाबतची माहिती होती. मात्र एका नव्या संशोधनानुसार, कोविड रूग्णांच्या नखांवर एक निशाणी येऊ शकते.

ईस्ट एंग्लिया विश्वविद्यालयच्या संशोधकांच्या केस स्टडीनुसार, कोविड 19 च्या इन्फेक्शननंतर रूग्णांच्या नखांवर एक विशिष्ठ खूण येते. यामुळे नखांचा रंगीही फिका पडतो आणि त्याच्या आकारातंही बदल होतो. अशा बदलांमुळे यांना कोव्हिड नेल्स असंही म्हटलं जातं.

ईस्ट एंग्लिया विश्वविद्यालयातील निखिल अग्रवाल, वासिलियोस वासिलीऊ आणि सुबोधिनी सारा सेलवेंद्र यांनी यावर अभ्यास केला. या अभ्यासामध्ये कोविड 19च्या संक्रमणामुळे नखांवर लाल रंगाच्या अर्ध-चंद्राची खूण दिसून येत असल्याची माहिती आहे. रूग्णांच्या नखांवर ही खूण पॉझिटीव्ह आल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत पहायला मिळते. जरी संशोधकांना केस स्टडीमध्ये अशी प्रकरणं आढळली असली तरीही कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोचण्यासाठी पुरेशी नाहीत.

कोरोनामुळे नखांवर अर्ध-चंद्राची खूण कशामुळे बनतेय?

नखांवर लाल रंगाच्या अर्ध-चंद्राची खूण तयार होण्यामागे कोरोना विषाणूमुळे रक्तवाहिन्यांचं नुकसान झाल्याचा संशय अभ्यासकांना आहे. अभ्यासकांच्या सांगण्याप्रमाणे, विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती रक्त गोठण्यास कारणीभूत ठरू शकते. ज्यामुळे नखांचा रंगही फिका पडू शकतो.