मुंबई : तणावग्रस्त आणि झपाट्याने बदलत जाणार्या आपल्या लाईफस्टाईलचा आरोग्यावर गंभीरपणे परिणाम होण्याची शक्यता आहे. वाढता ताणताणाव रक्तदाबाची समस्या वाढवण्यामागील एक कारण आहे. हा त्रास कमी करण्यासाठी केवळ औषध उपचार पुरेसे नाहीत. कारण एका टप्प्यानंतर औषधोपचारांचेही साईड इफेक्ट्स दिसतात. त्यामुळे तुम्हांलाही उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर त्यावर मात करण्यासाठी काही नैसर्गिक उपायांचीही मदत होऊ शकते.
स्ट्रेन्थ ट्रेनिंगमुळे रक्तदाब आटोक्यात ठेवण्यास मदत होते. वेट ट्रेनिंग, क्रन्चेस अशा व्यायाम नियमित करणं फायदेशीर ठरते.
स्विमिंगदेखील एक उत्तम व्यायामप्रकार आहे. रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी स्विमिंग हा उत्तम कार्डिओ व्यायामप्रकार आहे.
30 मिनिटांचा ब्रिस्क वॉकिंग हा व्यायामप्रकार उच्च रक्तदाबाचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी उत्तम व्यायामप्रकार आहे.
उच्च रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी ट्रेड मिलवर चालणं फायदेशीर आहे. 10 मिनिटं ट्रेड मिलवर चालायला सुरूवात करा. हळूहळू तुमचा वेग वाढवा.
नियमित योगासनं केल्यानेही उच्च रक्तदाबाचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते. योगासनाचा अभ्यास कोणीही आणि कुठेही करू शकतो त्यामुळे योगासनं करणं हा सोयीस्कर मार्ग आहे. यामध्ये पुरेशी काळजी घेतल्यास इजा होण्याचा धोका कमी होतो.
घरच्या घरी रश्शी उड्या मारणं, मेडिसीन बॉलसोबत व्यायाम करणं, हलकेच स्ट्रेचिंग करणं अशा व्यायामप्रकारांमुळे उच्च रक्तदाब आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
उच्च रक्तदाबाच्या रूग्णांनी व्यायामापूर्वी वॉर्म अप करणं आणि व्यायामानंतर शरीराला थंड होण्यासाठी पुरेसा वेळ देणं गरजेचे आहे. वाढलेली हृद्याची धडधड पुन्हा सामान्य स्वरूपात आणण्यासाठी त्याची मदत होते.