तरुणांमध्ये वाढतेय पित्ताशयातील खड्यांची समस्या; वेळीच उपचार करणं गरजेचं!

Gall bladder Stone Symptoms: अनेकदा आम्लपित्ताचे दुखणे समजून बरेच लोक उपचारांना विलंब करतात. दर महिन्याला ८ ते ९ रुग्ण ॲसिडिटीच्या तक्रारी घेऊन उपचारासाठी दाखल होतात. वैद्यकीय तपासणीनंतर मात्र त्यांना पित्ताशयात खडे असल्याचे निदान झाले आहे. 

सुरभि जगदीश | Updated: May 28, 2024, 12:54 PM IST
तरुणांमध्ये वाढतेय पित्ताशयातील खड्यांची समस्या; वेळीच उपचार करणं गरजेचं! title=

Gall bladder Stone Symptoms: गेल्या काही वर्षांपासून पित्ताशयातील खड्यांचा त्रास होणाऱ्यां रुग्णांची संख्या वाढत आहे. पित्ताशयातही खडे तयार होतात हे अनेकांना माहीत आहे. पण, हे खडे कशामुळे होतात याबाबत लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव दिसून येतो. पित्ताशयातील खडे होण्याचे मुख्य कारण म्हणजे बदललती जीवनशैली. मळमळ, उलट्या, ताप, अपचन, ढेकर येणे, सूज येणे आणि कावीळ ही काही संबंधीत लक्षणे आहेत. याव्यतिरिक्त पोटाच्या वरच्या भागात तीव्र वेदना जाणवते. 

अनेकदा आम्लपित्ताचे दुखणे समजून बरेच लोक उपचारांना विलंब करतात. दर महिन्याला ८ ते ९ रुग्ण ॲसिडिटीच्या तक्रारी घेऊन उपचारासाठी दाखल होतात. वैद्यकीय तपासणीनंतर मात्र त्यांना पित्ताशयात खडे असल्याचे निदान झाले आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने हे खडे आकाराने मोठे होतात. अशावेळी डॉक्टरांना उपचार करणे आव्हानात्मक ठरते. त्यामुळे ॲसिडिटी जास्त दिवस राहिल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पित्ताशयातील खडे हे पित्ताशयामध्ये तयार होतात आणि आकार आणि रचनेने भिन्न असतात, काही लहान असतात तर काही टेबल टेनिस बॉलच्या आकारा इतके मोठे असू शकतात. लठ्ठपणा, जलद वजन कमी होणे आणि बैठी जीवनशैली ही पित्ताशयातील खडे निर्माण होण्यामागील महत्वाचे कारणे असू शकते. पोटदुखी, मळमळ, उलट्या आणि कावीळ ही पित्ताशयातील खड्यांची सामान्य लक्षणे आहेत. ॲसिड रिफ्लक्सची लक्षणे देखील काहीशी सारखीच असल्याने बऱ्याचदा उपचार घेण्यास विलंब होतो. पित्ताशयात खडे असलेले लोकांना आम्लपित्ताचा त्रास होत आहे कारण दोन्ही स्थितींमध्ये लक्षणे सारखीच आहेत.

मुंबईच्या रूग्णालयातील जनरल अण्ड लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. हेमंत पटेल म्हणाले की, ‘‘दर महिन्याला ८-९ व्यक्तींमध्ये आंबट ढेकर येण्याची लक्षणे आढळतात. ज्यात ओटीपोटात दुखणे, खांद्याच्या चकतीमध्ये वेदना, पाठीदुखीचा त्रास, उजव्या खांद्यामध्ये होणाऱ्या वेदना आणि मळमळ तसेच उलट्यांचा समावेश असतो. लक्षणांमध्ये साम्यता आढळल्याने बऱ्याचदा गोंधळ होतो. तथापि पित्ताशयातील खडे अनेकदा पित्त नलिकांच्या अडथळ्यामुळे त्वचा किंवा डोळे पिवळसर होणे यासारख्या लक्षणांसह दिसून येता. ओटीपोटात अस्वस्थता जाणवत असल्यास या लक्षणांचे नेमके कारण शोधण्यासाठी रुग्णाचे वेळीच तपासणी करणे आवश्यक आहे. औषधे या स्थितीचे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकतात, बऱ्याचदा पित्ताशयावरील खड्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. लक्षात ठेवा की अचूक निदान योग्य उपचार प्रदान करण्यात आणि रुग्णांचा त्रास प्रभावीपणे कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.’’

मुंबईतील जनरल सर्जन डॉ. लकिन वीरा म्हणाले की, आम्लता आणि पित्ताशयातील खडे या दोन वेगळ्या आरोग्य समस्या आहेत. ते एकमेकांशी जोडलेले आहेत कारण या परिस्थितीमुळे अनेक व्यक्तींमध्ये पोटदुखी, मळमळ आणि उलट्या यांसारखी समान लक्षणे दिसून येतात. तीव्र ऍसिडिटीच्या समस्या असलेल्या लोकांना पचनसंस्थेची जळजळ आणि दाह झाल्यामुळे पित्ताशयात खडे होण्याची शक्यता जास्त असते. औषधे आणि शस्त्रक्रिया हे पित्ताशयातील खड्यांचे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकतात तर ॲसिडिटीच्या समस्येवर अन्न सावकाश चावून खाणे, आम्लयुक्त पदार्थ आणि पेयांचे सेवन टाळणे, जेवणाच्या वेळेचे पालन करणे, धूम्रपान आणि मद्यपान कमी करणे आणि जेवल्यानंतर लगेच न झोपणे याद्वारे यासारख्या टिप्सचे पालन करणे गरजेचे आहे