पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे होणारे आजार असे करा दूर

दूषित पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस यांसारखेही विकार 

Updated: Aug 15, 2020, 12:17 PM IST
पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे होणारे आजार असे करा दूर
मुंबई : सततच्या मुसळधार पावसामुळे आता सर्वत्रच साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. पावसाळ्यात सर्वाधीक प्रमाणात ठिकठिकाणी साचणाऱ्या दुषित पाण्यामुळे आजार पसरतात. या काळात डायरिया, कॉलरा, वाताचे विकार या पाण्यामुळे होणार्‍या आजारांबरोबरच सर्दी, खोकला- पडसे यासारखे आजार जडतात. दूषित पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस यांसारखेही विकार जडतात. याशिवाय पावसाळ्यात आपली पचनक्रिया मंदावते आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होत असल्याने यांसारखे संसर्गजन्य आजारांची लागण होते असल्याचे वोक्खार्ट हॉस्पिटलचे पोटविकारतज्ञ डॉ. प्रतीक तिबदेवाल यांनी सांगितले. 

या गोष्टींचे पालन करा

पावसाळ्यात दुषित पाणीपुरवठा होतो. नदीमध्ये सांडपाणी, कचरा, घाण हे मिसळल्यामुळे हे पाणी पिणं शरीरासाठी घातक असतं. असं दुषित पाणी प्यायल्यामुळे उलट्या, जुलाब, अतिसार, कॉलरा, हगवण, टायफॉइड आणि कावीळ यांसारखे अनेक साथीचे आजार होत असतात. पावसाळ्यात उकळून थंड केलेले स्वच्छ पाणी प्यावे. पाणी गरम करून वापरल्यामुळे पाण्यातील जंतू नष्ट होतात.
 

अंघोळीच्या पाण्यात एंटीसेप्टीक लिक्वीड घालावे. जेणेकरून अस्वच्छ पाण्यामुळे होणा-या त्वचारोगाला आळा घालता येईल.
 
हातांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. शौचालयाचा वापर केल्यानंतर, जेवण्यापुर्वी तसेच जेवण बनविण्यापुर्वी हात स्वच्छ साबणाणे धुवा. आपल्या हाताच्या नखांची स्वच्छता राखा.
 
पावसाळ्यात शिळे अन्न, अर्धवट शिजलेले मांसाहारी पदार्थ खाणे टाळावे कारण असे दुषित अन्न खाल्यामुळे पोटाचे विविध आझार, उलट्या, जुलाब, अतिसार, कॉलरा, हगवण, काविळ यांसारखे अनेक आजार होत असतात.
 
पाण्याचा साठा करून ठेवू नका. पिण्याच्या पाण्याची भांडी, पाण्याच्या टाक्या, पाईप्स वेळोवेळी स्वच्छ करा. पाण्याची भांडी झाकून ठेवा.
 
आपल्या आहारात फळे, पालेभाज्या या पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढेल.
 
ब्रोकोली, गाजर,  हळद आणि आले यासारखे पदार्थ आपली त्वचा आणि केसांसह रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. हळद ही औषधी वनस्पती असून यात अँटीऑक्सिडंट गुणधर्मांचा समावेश आहे. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश करा.
 
सर्दी व खोकल्यासाठी लसून अतिशय गुणकारी आहे. लसणात अ‍ॅण्टिबॅक्टेरियल गुण आहेत.ज्यामुळे अ‍ॅलर्जीला दूर पळविता येते.लसणाच्या सेवनामुळे व्हायरल, फंगल, यीस्ट आणि वर्म यांचा संसर्ग होत नाही. ताज्या लसणाच्या सेवनामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका कमी होतो.