मुंबई : देशात कोरोनानंतर ब्लॅक फंगसने धुमाकुळ घातलाय. तर आता त्यातच ग्रीन फंगस म्हणजेच हिरव्या बुरशीचे रूग्णंही देशात आढळू लागले आहेत. मध्य प्रदेशानंतर पंजाबच्या जालंधरमध्ये हिरव्या बुरशीचा पहिला रूग्ण सापडला आहे. नुकतंच कोरोनातून मुक्त झालेल्या एका रूग्णाला ग्रीन फंगसचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.
जालंधर सिव्हिल हॉस्पिटलचे डॉ. परमवीर सिंह म्हणाले की, हा रुग्ण नुकताच कोरोनामधून बरा झाला होता. सध्या त्याला देखरेखीखाली ठेवलं गेलं आहे. याबाबत सध्या तरी अधिक माहिती देऊ शकत नाही. यापूर्वी देखील हिरव्या बुरशीची एक केस आली होती मात्र ती कन्फर्म होऊ शकली नाही.
डॉ. परमवीर सिंह पुढे म्हणाले, ग्रीन फंगसच्या रूग्णांना खोकला, छातीत दुखणं त्याचप्रमाणे श्वास घेण्यास त्रास जाणवतो. ग्रीन फंगसचं दुसरं नाव Aspergillosis असं आहे. सध्या आमच्याकडे असलेल्या रूग्णावर आम्ही लक्ष ठेवून आहोत.
भारतात ग्रीन फंगसशिवाय ब्लॅक फंगस, व्हाइट फंगस आणि यलो फंगसची प्रकरणं आढळली आहेत. दरम्यान याच आठवड्यात मध्य प्रदेशातील इंदूर शहरात ग्रीन फंगसचं एक प्रकरण समोर आलं होतं. या रूग्णाला उपचारांसाठी मुंबईत आणण्यात आलं. हा रुग्णही कोरोनातून बरा झाला होता. डॉक्टरांच्या माहितीप्रमाणे, हा रुग्ण ब्लॅक फंगच्या रूग्णाच्या संपर्कात आला होता मात्र त्याला ग्रीन फंगसचा संसर्ग झाल्याचं समोर आलं.
महामारी अधिनियमानुसार, ब्लॅक फंगसला महामारी म्हणून घोषित करण्यात आलं आहे. ब्लॅक फंगसनंतर, बिहारमधील पाटणा आणि उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये व्हाईट फंगसची प्रकरणं आढळली होती. तज्ञांच्या मते, ब्लॅक फंगसपेक्षा व्हाईट फंगस अधिक धोकादायक आहे. याचा परिणाम फुफ्फुसांवर तसंच शरीराच्या इतर भागावर होतो.