गुलकंदाचे आरोग्याला होणारे फायदे

साखर व गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार केलेला ‘गुलकंद’ चवीला अवीट आणि आरोग्याला हितकारी आहे.

Updated: Jun 9, 2019, 10:49 AM IST
गुलकंदाचे आरोग्याला होणारे फायदे title=

मुंबई : गुलाबाचे फूल जितके नाजुक ,मोहक आहे तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत.  साखर व गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार केलेला ‘गुलकंद’ चवीला अवीट आणि आरोग्याला हितकारी आहे. जसजसा उकाडा वाढायला  लागतो , तसतसे पित्त, जळजळ , उष्माघात यासारखे आजार डोकं वर काढायला सुरूवात करतात. मग गरमी पासून सुटका करण्यासाठी बाजारात मिळणारी शीतपेयं  घेण्यापेक्षा शीतदायी आणि तृष्णाशामक गुलकंदच घ्या.  आयुर्वेदातही गुलकंदाचा वापर प्रामुख्याने अनेक औषधांमध्ये केला जातो. गुलकंदामध्ये व्हिटामिन सी, ई आणि बी भरपूर प्रमाणात असते. याच्या सेवनाने शरीर थंड राहते आणि उन्हाळ्यामुळे होणारा त्रास दूर होतो. जाणून घ्या कसा बनवतात गुलकंद

साहित्य 
गुलाबच्या पाकळ्या - २०० ग्रॅम  
साखर- १०० ग्रॅम 
छोटी वेलची- १ टीस्‍पून 
बडिशेप - १ टीस्पून

कृती 
गुलाबाच्या पाकळ्या धुवून घ्या आणि इतर सर्व साहित्यांचे मिश्रण एकजीव करून घ्या. १० दिवस हे मिश्रण एका काचेच्या बरणीत उन्हात ठेवा. मध्ये मध्ये हे मिश्रण हलवत राहा. जेव्हा गुलाबाच्या पाकळ्या मऊ झाल्यात असे दिसेल तर तुमचा गुलकंद तयार आहे.

गुलकंद खाण्याचे फायदे
- गुलकंदाच्या सेवनाने शरीर ताजेतवाने राहते. तसेच गारवा मिळतो. उन्हामुळे येणारा थकवा, आळस, शरीरातील जळजळ दूर होते. शरीराला ऊर्जा देणारे हे टॉनिक आहे. 

- उन्हाळ्यात अनेकांच्या नाकातून रक्त येते. यातून वाचण्यासाठी उन्हात जाण्याआधी दोन चमचे गुलकंद खा. 

- गरोदर महिलांसाठी याचे सेवन खूपच फायदेशीर ठरते. गरोदरपणात बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर गुलकंद खाण्याने फायदा होतो.

- दररोज गुलकंद खाल्ल्याने त्वचा उजळते. यामुळे रक्त शुद्ध होते. त्यामुळे ब्लॅकहेड्स, पिपल्सच्या समस्या दूर होतात.

- तोंड आल्यास गुलकंदाचे सेवन करावे. तसेच हिरड्या सुजल्यास यावरही गुलकंदाचे सेवन फायदेशीर ठरते.