Hair Care In Mansoon : पावसाळ्यात ऑफिसला किंवा शाळेत जाताना केस भिजतात. केस तसेच ओले राहिल्यामुळे देखील केसांत उवा आणि लिखा होण्याची शक्यता जास्त असते. केसांची वेळच्या वेळी निगा राखा असं डॉक्टर कायमचं सांगतात. मात्र रोजच्या धावपळीमुळे केसांच्या आरोग्याकडे नकळतपणे दुर्लक्ष होतं. रोज ट्रेनमधून प्रवास करताना किंवा शाळेतल्या मुली एकमेकींच्या जास्त संपर्कात येतात त्यामुळे देखील केसांत उवा होतात. सतत केसांत खाज येऊन अगदी नको नको होतं. केसात कोंडा झालाय किंवा स्कॅल्प कोरडी पडली आहे ,म्हणून खाज येत असेल असा अनेक जणींचा गैरसमज असतो. मात्र फक्त कोंडा झाल्यानेच केसात खाज येत नाही हे वेळीच लक्षात घ्यायला हवं.
लिंबूमध्ये सायट्रीक अॅसिड आणि व्हिटामीन सी असतं. त्याचबरोबर आलं देखील केसांच्या वाढीसाठी गुणकारी आहे. तुमच्या केसात खूपच उवा झाल्या असतील, तर आलं आणि लिंबाच्या रसाचा प्रयोग तुम्ही करु शकता. दोन चमचे समप्रमाणात लिंबाचा रस आणि आल्याची पेस्ट एकत्र करुन केसांना आणि स्कॅल्पला मसाज करा. आलं आणि लिंबाचा रस जंतूनाशक असल्याने उवा आणि लिखा निघून जातात.
तेलाचा मसाज
नारळाच्या तेलामध्ये पुदीन्याच्या पानांचा रस, कडुलिंबाचं तेल एकत्र करा. हे तेल हे केसांना तासभर लावून ठेवा. त्यानंतर केस थंड पाण्याने स्वच्छ धुवा.
केसातल्या उवा निघून जाण्यासाठी कापूर रामबाण उपाय आहे. तुम्ही कापूर केसांना लावला तर केसातील कोंडा दूर होतो. तसंच उवा जाण्यासाठी देखील कापूर फायदेशीर आहे. नारळाच्या तेलात भीमसेनी कापूर मिक्स करा आणि या तेलाने केसांच्या मुळांशी मसाज करा. असं केल्यामुळे कापराच्या वासाने उवा बाहेर पडतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)