अष्टवक्रासनाच्या मदतीने वाढवा चेहर्‍यावरील कांती

अष्टवक्रासन हे कठीण आसनांपैकी एक आहे. 

Updated: Jun 1, 2018, 08:41 AM IST
अष्टवक्रासनाच्या मदतीने वाढवा चेहर्‍यावरील कांती  title=

मुंबई : अष्टवक्रासन हे कठीण आसनांपैकी एक आहे. अष्टवक्रासनामध्ये शरीरावर अधिक मेहनत घेण्याची गरज असते. या आसनामुळे आत्मविश्वास सुधारायला मदत होते. सोबतच चेहर्‍यावरील कांती खुलवण्यासाठी महागड्या ब्युटी ट्रीटमेंटशिवाय अशाप्रकारची आसनं अधिक मदत करतात. अष्टवक्रासनामुळे शरीरामध्ये रक्तभिसरणाची प्रक्रिया सुधारते. परिणामी चेहरा नैसर्गिकरित्या खुलण्यास मदत होते. 

कसं कराल अष्टवक्रासन ? 

आसन करण्यापूर्वी पाय गुडघ्यात वाकून जमिनीवर बसा. 

अष्टवक्रासन करण्यासाठी तुमचा एक पाय शक्य तितका खांद्याच्या बाजुला वर खेचा. तो खांद्यावर ठेवण्याचा प्रयत्न करा. 

त्यावर दुसरा पाय ठेवा. आणि शरीराचा भार तुमच्या दोन्ही हातांवर सावरण्याचा प्रयत्न करा. 

यानंतर पाय एका बाजुला नेण्याचा प्रयत्न करा. 

मान समोर आणि सरळ रेषेत ठेवा. या स्थितीमध्ये काही सेंकंद दीर्घ श्वास घ्या. 

नियमित या व्यायामाने तुम्हांला शरीराचा भार सावरणं शक्य होईल. मात्र सुरूवातीच्या टप्प्यावर तुम्ही एखाद्या बॉक्सचा मदतीने शरीर वरच्या बाजूने सावरण्यास मदत घेऊ शकता. 

अष्टवक्रासनामुळे जसे त्वचेचे सौंदर्य खुलते तसेच या आसनाचा फायदा खांदे आणि आर्म्स बळकट होण्यासही मदत होते.