मुंबई : राज्यात सगळ्याच ठिकाणी सध्या उकाडा वाढला आहे. दुपारच्या वेळस बाहेर पडणं कठीण झालं आहे. मात्र कामानिमित्त आपल्याला बाहेर पडावंच लागतंय. अशावेळी आपण काहीही विचार न करत कामासाठी बाहेर पडतो. मात्र असं करणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. यासाठीच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, उन्हाळ्याच्या दिवसांत घराबाहेर पडण्यापूर्वी नेमकं काय केलं पाहिजे.
उकाड्याच्या दिवसात रिकामी पोटी बाहेर पडल्याने उन्हामध्ये चक्कर येण्याची शक्यता असते. शिवाय तुम्हाला अधिक थकल्यासारखं वाटू शकतं. त्यामुळे उकाड्याच्या दिवसामध्ये घरातून नाश्ता करूनच बाहेर पडा.
तुम्ही अर्ध्या तासासाठी घराबाहेर जात असाल तरीही पाण्याची बाटली सोबत ठेवा. उकाड्याच्या दिवसात दर 10-15 किंवा 20 मिनिटांनी पाणी पित रहा. यामुळे तुम्ही हायड्रेटेड राहाल आणि सूर्यप्रकाशाचा कोणताही परिणाम होणार नाही.
जर तुम्ही उन्हात बाहेर जाण्यापूर्वी तुमच्या त्वचेची काळजी घेतली नाही तर तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे घरातून बाहेर पडण्यापूर्वी 20 मिनिटं आधी तुमचा चेहरा, मान, हात आणि उघड्यावर सनस्क्रीन लावा. जर तुम्ही बराच वेळ बाहेर असाल तर सनस्क्रीन पुन्हा लावायला विसरू नका. घरी परतल्यानंतर, आपला चेहरा चांगल्या क्लिन्झरने धुवा आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावा.