Male infertility: प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी हाय स्पर्म फ्रॅगमेंटेशन उपाययोजना आवश्यक, तज्ज्ञांचा सल्ला

Male infertility: नियमित व्यायाम करणे अत्यंत फायदेशीर आहे, कारण यामुळे एकूणच आरोग्य सुधारते आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस देखील कमी होतो. दरम्यान जास्त व्यायाम टाळणे महत्वाचे आहे, ज्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

सुरभि जगदीश | Updated: Jun 24, 2024, 09:05 PM IST
Male infertility: प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी हाय स्पर्म फ्रॅगमेंटेशन उपाययोजना आवश्यक, तज्ज्ञांचा सल्ला title=

Male infertility: पुरुषांतील वंध्यत्वाचा सहसा हाय स्पर्म फ्रॅगमेंटेशनशी संबंध असू शकतो, एक असा विकार ज्यामध्ये शुक्राणूंच्या पेशींमधील डीएनए खराब होतात. यामुळे शुक्राणूंची अंडे फलित करण्याची क्षमता बिघडू शकते किंवा गर्भधारणा होण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी हाय स्पर्म फ्रॅगमेंटेशन वर उपाय करणे आवश्यक आहे, आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी विविध उपाय केले जाऊ शकतात.

जीवनशैलीतील बदल

वरिष्ठ वैज्ञानिक - रीप्रॉडक्टीव्ह जीनोमिक्सचे डॉ. शिव मुरारका म्हणाले, हाय स्पर्म फ्रॅगमेंटेशन व्यवस्थापित करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे जीवनशैली मध्ये सकारात्मक बदल करणे. पुरुषांनी व्हिटॅमिन सी आणि ई, सेलेनियम आणि झिंक यासारख्या अँटिऑक्सिडंट्स ने समृद्ध संतुलित आहार घ्यावा. फळे, भाज्या, काजू आणि कडधान्ये यासारख्या पदार्थांमध्ये पोषक घटकांचे प्रमाण भरपूर असते.

नियमित व्यायाम करणे अत्यंत फायदेशीर आहे, कारण यामुळे एकूणच आरोग्य सुधारते आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस देखील कमी होतो. दरम्यान जास्त व्यायाम टाळणे महत्वाचे आहे, ज्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. वजन योग्य असणे देखील महत्त्वपूर्ण आहे, हाय स्पर्म फ्रॅगमेंटेशन साठी लठ्ठपणा कारणीभूत ठरू शकतो, असंही डॉ. शिव म्हणाले.

पर्यावरणातील विषारी पदार्थांशी संपर्क टाळणे

कीटकनाशके, अवजड धातू आणि रेडीएशन यासारख्या पर्यावरणीय विषाणूंच्या संपर्कात आल्याने शुक्राणूं मधील डीएनएच्या विभाजनामध्ये वाढ होऊ शकते. पुरुषांनी धूम्रपान टाळणे, अल्कोहोलचे सेवन मर्यादित करणे आणि औद्योगिक रसायनांचा संपर्क कमी करून या विषाणूंचा संपर्क कमी केला पाहिजे. कामाच्या ठिकाणी अशा पदार्थांचा संपर्क टाळणे शक्यच नसेल तर कामाच्या ठिकाणी संरक्षणात्मक साहित्य वापरणे आणि मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

तणाव कमी करणे

अति तणावामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसची पातळी वाढू शकते आणि त्याचा शुक्राणूंच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होतो. पुरुषांनी ध्यानधारणा, योग यासारख्या तणाव व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम केल्याने देखील तणाव पातळी कमी करता येते वैद्यकीय उपचार जेव्हा जीवनशैलीतील बदल अपुरे असतात, तेव्हा वैद्यकीय उपाय करणे गरजेचे असू शकते. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यासाठी अँटीऑक्सिडंट पूरक आहार घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. शुक्राणूंच्या उत्पादनास उत्तेजन देण्यासाठी क्लॉमिफेन सायट्रेट सारख्या औषधांचा वापर देखील केला जाऊ शकतो. 

डॉ. मुरारका यांच्या सांगण्यानुसार, ज्या पुरुषांमध्ये स्पर्म फ्रॅगमेंटेशनचे प्रमाण तीव्र असते अशा पुरुषांना इंट्रा साइटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन (आयसीएसआय) सारख्या असिस्टेड रीप्रॉडक्टीव्ह टेक्नॉलॉजी (एआरटी) वापरण्याचा सल्ला देखील दिला जाऊ शकतो. आयसीएसआय मध्ये एका शुक्राणूला थेट अंड्यात सोडले जाते, डीएनए खंडित होण्याशी संबंधित समस्यांसाठी हा एक चांगला उपाय आहे. नियमित देखरेख आणि वैद्यकीय सल्ला नियमित वीर्य विश्लेषण आणि डीएनए फ्रॅगमेंटेशन चाचणी केल्याने, उपायांचा फायदा होतो आहे का हे समजते. पुरुषांनी त्यांच्या विशिष्ट गरजा आणि चाचणी निकालांच्या आधारे व्यवस्थापन योजना तयार करण्यासाठी प्रजनन तज्ञा बरोबर काम केले पाहिजे.

हाय स्पर्म फ्रॅगमेंटेशनची काळजी घेण्यासाठी, जीवनशैलीत बदल, पर्यावरणीय विषाणूंचा संपर्क कमी करणे, तणाव कमी करणे आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय उपाय असे विविध उपाय करणे गरजेचे आहे. असे उपाय करून पुरुषांच्या शुक्राणूंच्या गुणवत्ते मध्ये मोठ्या प्रमाणात फरक पडतो आणि त्यांची प्रजनन क्षमता वाढते. प्रभावी उपचार योजना तयार करण्यासाठी आणि पुनरुत्पादक आरोग्य वाढविण्यासाठी नियमित देखरेख आणि तज्ञांचे मार्गदर्शन आवश्यक आहे.