मुंबई : डोळे हे आपल्या शरीरातील अत्यंत नाजूक अवयवांपैकी एक आहे. अनेकदा आपण डोळ्यांची खास काळजी घ्यायला विसरतो. परिणामी इन्फेक्शन ते अगदी दृष्टी कमजोर होण्यापर्यंत अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
डोळ्याशी निगडीत कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करणं भविष्यात धोकादायक ठरू शकते. म्हणूनच तुमच्या डोळ्यातून सतत पाणी येत असल्यास घाबरून जाऊ नका. डोळे पुरेसे स्वच्छ न केल्यास हा त्रास वाढू शकतो. म्हणूनच काही घरगुती उपायांनी तुम्ही हा त्रास नियंत्रणात ठेवू शकता.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी गुलाबपाणी फायदेशीर आहे. डोळ्यातील इंफेक्शन, अॅलर्जीला दूर ठेवण्यासाठी गुलाबपाणी मदत करते. नियमित गुलाबपाण्याचे दोन थेंब डोळ्यात टाकणं आरोग्याला फायदेशीर आहे.
गुलाबपाण्याप्रमाणेच थंड दूधही डोळ्याचं आरोग्य जपायला मदत करते. थंड दूधामध्ये स्वच्छ कपडा भिजवून ठेवा. थोड्या वेळाने तो डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांचं आरोग्य जपायला मदत होते.
काकडी थंड प्रवृत्तीची असल्याने डोळ्यातील अतिरिक्त दाह कमी करण्यास मदत होते. डोळ्यात जळजळ किंवा पाणी वाहण्याचा त्रास होत असल्यास डोळ्यांवर काकडी ठेवा. किमान 10-15 मिनिटं काकडी ठेवून शांत बसल्याने डोळ्यावरील ताण हलका होण्यास, जळजळ कमी होण्यास मदत होईल.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाजर अत्यंत फायदेशीर आहे. नियमित किमान ग्लासभर गाजराचा रस किंवा स्लाईस, सलाडच्या माध्यमातून आहारात गाजराचा समावेश केल्यास फायदा होतो.