ब्रँडेड कंपन्या मधाच्या नावाखाली 'साखरेचा पाक' मारतायेत माथी

तुम्ही मध (honey) खात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी. अनेक बड्या कंपन्या मधाच्या नावाखाली साखरेचा पाक ( sugar syrup) विकत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

Updated: Dec 4, 2020, 04:43 PM IST
ब्रँडेड कंपन्या मधाच्या नावाखाली 'साखरेचा पाक' मारतायेत माथी  title=

मुंबई : तुम्ही मध (honey) खात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी. अनेक बड्या कंपन्या मधाच्या नावाखाली साखरेचा पाक ( sugar syrup) विकत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विज्ञान आणि पर्यावरण केंद्राचा तसा अहवाल (Center for Science and Environment) आहे. मात्र, सीएसईचा दावा मध उत्पादक कंपन्यांनी फेटाळला आहे.

बाजारात मिळणाऱ्या नामांकित कंपन्या मधाच्या मापदंडात बाद ठरल्या आहेत. या नामांकित कंपन्यांच्या मधात ७७ टक्क्यांपर्यंत साखरेचा पाक असल्याचे उघड झाले आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हार्यमेंटने केलेल्या तपासात हे उघड झाले आहे. सीएसईने १३ लहानमोठ्या कंपन्यांच्या मधाचे नमुने तपासले. या नमुन्यांमध्ये ७७ टक्क्यांपर्यंत भेसळ आहे. 
मधाच्या २२ मापदंडांपैकी काही कंपन्या केवळ ५ मापदंडांमध्ये खऱ्या उतरल्या आहेत.

अनेक बड्या कंपन्यांचे मध शुद्धतेचे प्रमाण तपासणाऱ्या न्युक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स (NMR) या चाचणीत अयशस्वी ठरले. पण नामांकित कंपन्यांनी कंपन्यांनी या चाचणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दरम्यान, कंपनीची प्रतीमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचं या कंपन्यांचं म्हणणंय. भारतात मिळणाऱ्या नैसर्गिक मधाचीच विक्री करत असल्याचा दावा यां कंपन्यांनी केलाय. दरम्यान, यामध्ये फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटीच्या (FSSAI) नियमांचे योग्यरित्या पालन केल्याचं कंपन्यांनी म्हटले आहे.