मुंबई : स्त्रियांचे सौंदर्य लांबसडक केसांमुळे अधिक खुलते. पण केस लांबसडक असतील तर त्याच्या टोकांपर्यंत पोषण पोहचवणं अधिक आव्हानात्मक असते. त्यामुळे केस लांब असले तरीही ते टोकापर्यंत मजबूत असतीलच असे नाही. अनेकदा केसांना टोकांना पोषण न मिळाल्याने ते फ्रिझी, दुतोंडी दिसतात.
केस तुटू नयेत म्हणून केस विंचरताना काळजी घेणं आवश्यक आहे. अनेकदा केसांमधील गुंता हा केस विंचरताना टोकाशी अधिक दिसतो. यामुळे केस सावकाश विंचरणे आवश्यक आहे. अन्यथा केस तुटतात.
लाकडी फणी केसांच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. लाकडी फणीमुळे सेबम केसांमध्ये सर्वत्र समान प्रमाणात पोहचते. त्यामुळे केसांना चमक येण्यास मदत होते.
केस धुताना अनेकजण कंडीशनर लावणं टाळतात. कंडीशनर लावणं ही वेळखाऊ प्रक्रिया असली तरीही केसांचे आरोग्य जपण्यासाठी आवश्यक आहे. केसांना टोकांपर्यंत मुबलक प्रमाणात कंडीशनर लावा. त्यानंतर पुरेसा वेळ ते केसांवर राहू द्या. त्यानंतरच केस स्वच्छ धुवावेत.
हीट ट्रिटमेंटमुळे केसांचे नुकसान अधिक होते. त्यामुळे हेअर आयर्निंग, स्ट्रेटनिंग किंवा हेअर ड्रायरचा वरचेवर वापर टाळा. यामुळे केसांचे अधिक नुकसान होते.
प्रवासात केस मोकळे सोडल्यानेही ते खराब होतात. त्यामुळे प्रवासात केस मोकळे सोडण्याऐवजी घट्ट वेणी किंवा बनमध्ये बांधून ठेवा. यामुळे केसांचे नुकसान होणार नाही.
रात्री झोपताना केस बांधून झोपा. यामुळे केस गुंतण्याची समस्या कमी होते. परंतू खूप घट्ट वेणी किंवा क्लिप लावून झोपू नका.
केस निस्तेज दिसू नयेत म्हणून ते वेळोवेळी ट्रिम करणं आवश्यक आहे. केस ट्रिम केल्याने स्प्लिट होण्याचा म्हणजेच दुतोंडी केसांची समस्या आटोक्यात राहते.
किमान आंघोळीपूर्वी अर्धातास आधी केसांना मुबलक तेलाचा मसाज करा. यामुळे केसांना मॉईश्चरायझर मिळायला मदत होते.