मुंबई : पावसाळ्यात निसर्गाचं सारं रूप बदलतं, वातावरण अल्हाददायक होते मात्र या दिवसात साचलेल्या पाण्यावर मच्छर, माश्या, कीटकदेखील घरात येतात. माश्या उपद्रवी वाटत नसल्या तरीही त्यांच्यामुळे सुमारे 60 विविध आजार पसरण्याची शक्यता असते. माश्या अन्नावर, पाण्यावर बसल्यास ते दुषित करतात आणि यामुळे डिसेंट्री, टायफाईड, कॉलरा आणि गॅस्ट्रोइंट्रीटीस यांचा धोका वाढतो. म्हणूनच अन्नपदार्थांवर माश्यांचा वावर होऊ नये तसेच आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून या काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
किचनमधील ओटा स्वच्छ ठेवा :
घरातील ज्या ठिकाणी जेवण बनवले जाते ती जागा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. याकरिता चांगल्या डिसइंफेक्ट सोल्युशनचा वापर करा. ब्लिच बेस्ड किंवा क्लोरिन बेस्ड क्लिनर्सने ओटा स्वच्छ ठेवा.
कचरा योग्यरित्या टाका :
घरातील कचर्याची विल्हेवाट योग्यप्रकारे लावणे गरजेचे आहे. त्यासाठी बंद किंवा झाकण असलेले डस्बिन (कचरापेटी) वापरा. कचर्यावर माश्यांची वाढ होते. त्यामुळे घरातील कचरा वेळीच बाहेर टाका.
अन्न झाकून ठेवा :
घरातील अन्न झाकून ठेवा. तसेच फळं, कापलेल्या भाज्यादेखील फार वेळ उघड्या ठेवू नका.
घरातील झाडांची काळजी घ्या :
घरातील झाडांची पुरेशी काळजी घ्या. त्यांना अतिप्रमाणात पाणी घालू नका. सुकलेली पानं, कचरा वेळीच साफ करा.
खिडक्यांना जाळी लावा :
घरातील कीटक, माश्या, मच्छर येऊ नयेत म्हणून खिडक्यांना जाळी, मच्छरदाणी लावा. यामुळे तुम्ही खिडक्या अधिक वेळ उघड्या ठेवू शकता तसेच मच्छर – माश्यांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
घरातील पाळीव प्राण्यांची काळजी घ्या :
घरात पाळीव असल्यास त्यांची विष्ठा तात्काळ स्वच्छ करा. तसेच त्यांना नियमित आंघोळ घालणे आवश्यक आहे. बाहेरून घरात येताना प्राण्यांचे पायदेखील स्वच्छ करा.
इंसेक्ट रेपेलंट स्प्रे मारा :
घरात कीटकांचा वावर कमी करण्यासाठी इंसेक्ट रेपेलंट स्प्रे मारा. मात्र त्याचा वापर करताना घरातील लहान मुलं तसेच खाण्याचे पदार्थ दूर ठेवा.
बाजारातील काही विकतच्या उपायांबरोबरच या काही घरगुती उपायांनीदेखील कीटकांचा घरातील वावर कमी करण्यास मदत होते.
कापूर : धार्मिक कार्यामध्ये कापूर वापरला जातो. संध्याकाळी धूपासोबत कापूर जाळल्यास माश्या कमी होतात. घरात चारही कोपर्यात कापराच्या गोळ्या टाका. माश्या खूप असतील तर कापूर जाळा. कापराच्या दर्पामुळे माश्या कमी होण्यास मदत होते.
तुळस : घरा-घरात किमान तुळशीचं रोप जरूर आढळतं. तुळशीमधील औषधी गुणधर्मासोबत कीटकांना दूर ठेवण्याची क्षमतादेखील आहे. घरात तुळशीचे रोप लावल्यास माश्यांचा वावर कमी होतो.
फ्लाय स्वॅट : हाअ एक स्वस्तात मस्त उपाय आहे. माश्यांना मारणारे इलेक्ट्रिकल रॅकेटही आज बाजारात उपलब्ध आहे.
तेल : निलगिरी, लव्हेंडर, पेपरमिंट,गवती चहा यासारखी नैसर्गिक तेलांनी कीटकांना दूर ठेवण्यास मदत होते. या तेलामध्ये कापसाचा बोळा बुडवून तो हवाबंद डब्ब्यात ठेवा. ज्याठिकाणी कीटक असतात तेथे हा डबा उघडा करून ठेवा.