COVID-19 Vaccination Connection With Sudden Death Among Young: कोरोना साथीच्या कालावधीमध्ये सरकारने मृतांचा आकडा वाढू नये म्हणून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली होती. देशामध्ये 2 अब्जाहून अधिक लसींचे डोस देण्यात आले. मात्र मागील एक ते दीड वर्षांपासून देशातील तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं आहे. हार्ट अटॅकमुळे मृत्यू होणाऱ्या तरुणांची संख्या वाढल्याचं चित्र मागील दीड वर्षात दिसत आहे. असं असतानाच आता या वाढत्या हार्ट अटॅकच्या संख्येमागील कारण कोरोना लसी तर नाहीत ना अशी चर्चा सुरु झाली आहे. खरोखरच कोरोना लसी आणि वाढत्या हार्ट अटॅकच्या प्रकरणांचा काही संबंध आहे का यावर आता केंद्र सरकारअंतर्गत येणाऱ्या देशातील सर्वात मोठी आरोग्यविषय संस्था असलेल्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) खुलासा केला आहे.
आयसीएमआरने कोरोना लसीकरण आणि हार्ट अटॅक प्रकरणांसंदर्भातील अभ्यास केला. कोरोना लसीकरणाचा अचानक तरुणांच्या मृत्यूचं प्रमाण वाढवण्याशी काही संबंध आहे का? या प्रश्नाचं उत्तर या अभ्यासादरम्यान शोधण्याचा प्रयत्न केला. आपल्या या अभ्यासामध्ये आयसीएमआरने भारतामध्ये झालेल्या कोरोना लसीकरणामुळे तरुणांमधील मृत्यूचं प्रमाण वाढलेलं नाही, असं म्हटलं आहे. कोरोनाच्या साथी आधीपासूनच असलेल्या व्याधी, कुटुंबामध्ये यापूर्वी अशाप्रकारे एखाद्या सदस्याचा मृत्यू होणे तसेच लाइफस्टाइलमधील बदल यासारख्या गोष्टींमुळे तरुण वयात मृत्यू होण्याची शक्यता वाढते असं आयसीएमआरच्या अभ्यासात म्हटलं आहे.
कोरोना लसीकरणाचा अचानक मृत्यू होण्याशी काहीही संबंध नसल्याचं या अभ्यासाच्या अहवालामध्ये आयसीएमआरने स्पष्ट केलं आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात राबवण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत कोणत्याही व्यक्तीने किमान एक लस घेतली असेल तर मृत्यूचा धोका फार कमी होतो असं आयसीएमआरने म्हटलं आहे.
कोरोनामुळे रुग्णालयामध्ये दाखल झाल्याचा इतिहास असेल किंवा कुटुंबामध्ये यापूर्वी अशाप्रकारे कोणाचा आकस्मिक मृत्यू झाला असेल किंवा मृत्यूच्या 48 तास आधी मद्यप्राशन केलं असेल अथवा अंमली पदार्थांचं सेवन केलं असल्यास अथवा फार व्यायाम केला असल्यास अचानक मृत्यू होण्याची शक्यता वाढवते, असं आयसीएमआरने म्हटलं आहे.
"COVID-19 vaccination did not increase the risk of unexplained sudden death among young adults in India. Past COVID-19 hospitalization, family history of sudden death and certain lifestyle behaviours increased the likelihood of unexplained sudden death," says ICMR Study pic.twitter.com/pmeh0et1On
— ANI (@ANI) November 21, 2023
आयसीएमआरने हा अभ्यास 1 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2023 दरम्यान केला आहे. यामध्ये देशातील एकूण 47 रुग्णालये सहभागी झाली. या अभ्यासामध्ये 18 ते 45 वर्षांच्या त्या लोकांना सहभागी करण्यात आलं होतं जे फार ठणठणीत होते. यापैकी कोणालाही आधीपासून कोणत्याही प्रकारची आरोग्यविषयक तक्रार नव्हती. या अभ्यासामध्ये ज्या लोकांनी कोरोनाच्या 2 लसी घेतलेल्यांचा अचानक मृत्यू होण्याची शक्यता फारच कमी असल्याचं दिसून आलं असं आयसीएमआरने म्हटलं आहे.