मुंबई : इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या कोविड-19 वरील नॅशनल टास्क फोर्सने एक मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना संसर्गाच्या क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलमध्ये अँटी-व्हायरल औषध मोलनुपिरावीरचा समावेश न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी कोविड उपचारांमध्ये मोलनुपिरावीर फारसं फायदेशीर नाही असं म्हटलंय.
सोमवारी आयसीएमआरच्या नॅशनल टास्क फोर्सची बैठक झाली. ज्यामध्ये तज्ज्ञांनी मोलनुपिरावीरशी संबंधित आरोग्यविषयक समस्यांवर चर्चा केली. तसंच बैठकीत तज्ज्ञांनी सांगितले की, मोलनुपिरावीर हे औषध कोरोना उपचारासाठी फारसं उपयुक्त नाही. त्यानंतर मोलनुपिरावीरला क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलमधून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मोलनुपिरावीर हे व्हायरसविरोधातील एक औषध आहे. जे viral mutational replication रोखण्यास सक्षम आहे. ड्रग रेग्युलेटर जनरल इंडियाने 28 डिसेंबर रोजीच या अँटी-कोरोना गोळीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली होती.
दरम्यान ICMR ने कोरोना उपचारांसाठी दिलेल्या प्रोटोकॉलमधून काढून टाकल्यानंतरही मोलनुपिरावीरची विक्री थांबवली जाणार नाही. डॉक्टरांशी सल्लामसलत करून हे औषध घेता येऊ शकणार आहे.
आयसीएमआरचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी गेल्या आठवड्यात सांगितलं होतं की, WHO आणि लंडनमध्ये हे औषध कोरोना उपचारासाठी वापरत नाहीत. या औषधाशी संबंधित सुरक्षेच्या समस्या समोर आल्या आहेत. यामुळे गर्भाची विकृती होऊ शकते. तसंच स्नायूंचंही काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे