मुंबईतील मानखुर्द परिसरात 19 वर्षीय प्रथमेश भोकसेचा शॉरमा खाल्ल्याने मृत्यू झाला आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. शॉरमा खाल्ल्याने प्रथमेशला उलट्या आणि पोट दुखीचा त्रास होत असेल. शॉरमा खाल्ल्यामुळे प्रथमेशचा त्रास थांबत नव्हता यामुळे त्याला तात्काळ के.ई.एम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी प्रथमेशवर उपचार सुरु झाले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. मुंबईत अन्नातून विषबाधा होण्याची दोन आठवड्यांतील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात गोरेगावमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या एका विक्रेत्याकडून चिकन शॉरमा खाल्ल्याने 12 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रथमेश भोकसे याने 3 मे रोजी ट्रॉम्बे भागातील रस्त्याच्या कडेला असलेल्या एका स्टॉलवरून चिकन शॉरमा खरेदी केला होता. 4 मे रोजी प्रथमेशला पोटात तीव्र वेदना आणि उलट्या होऊ लागल्याने तो उपचारासाठी जवळच्या महापालिकेच्या रुग्णालयात गेला. घरी परतल्यानंतर भोकसेची प्रकृती पुन्हा ढासळू लागली, त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला 5 मे रोजी शासकीय केईएम रुग्णालयात नेले. दुसऱ्या दिवशी त्याची प्रकृती पुन्हा बिघडू लागल्यावर त्याला पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोमवारी भोकसे यांचा मृत्यू झाला.
अन्न विषबाधा हा एक प्रकारचा अन्नाशी निगडीत असा आजार आहे, जो दूषित पदार्थांच्या सेवनामुळे होतो. जेव्हा एखादा अन्नपदार्थ बॅक्टेरिया, विषाणू दूषित होतो आणि आपण ते खातो तेव्हा त्यामुळे अन्न विषबाधा होते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)